ब्रेकिंग न्यूज़

अस्सल मातीतला भावकवी

रंगली कुपां दर्यामुखार, वयतना गे सांज |
ल्हारा ल्हारार झांजरली गे पैंजणाची झांज ॥
बाकीबाब बोरकरांच्या काव्य – कुळधर्माचा वारसा चालवणारा रमेश भगवंत वेळुस्कर नावाचा कलंदर कवी नुकताच दूर रायबरेलीत अनंताच्या यात्रेला निघून गेला. निसर्ग आणि प्रेमासारख्या चिरंतन चैतन्यमयी प्रेरणांचा आपल्या कवितेतून अखंड गजर करीत आलेल्या या कवीच्या कवितेमध्ये शब्दांचे लालित्य, अर्थाची आशयघनता आणि त्याच्या तळाशी अध्यात्म आणि तत्त्वचिंतनाची बैठक असा त्रिवेणी संगम दिसून येत होता आणि तेच तिचे वेगळेपण होते. आपल्या काव्यधर्माचे गांभीर्य या कवीने सातत्याने आजतागायत अव्याहत जपले आणि गोव्याच्या बहुजनसमाजाच्या लोकजीवनाशी आणि लोकमानसाशी नाळ जुळलेली अस्सल मातीचा गंध घेऊन आलेली वेळुस्करांची कविता लखलखीतपणे कोकणी काव्यसरस्वतीचे दालन उजळून गेली. र. वि. पंडित यांनी ७६ साली निवडक आश्वासक कोकणी कवींचा पहिलावहिला ‘रत्नांहार’ गुंफला, त्यात रमेश भगवंत वेळुस्कर हे उदयोन्मुख नावही आपल्या अस्सल काव्यजाणिवांचे उमाळे घेऊन अवतरलेले दिसते. पुढे ‘मोरपाखां’ १९७९ साली प्रकाशित झाला तेव्हा वेळुस्कर यांनी तो पंडित यांनाच अर्पण केला होता. आपल्या कवितेमागील निसर्गप्रेरणा सांगताना कवी त्यामध्ये लिहून गेला आहे,
पयस पाचवे दोंगुल्लेतल्यान | झरता मोगाळ कोगुळ तान |
अशो वेंगेंत घेत ही चित्रां | जाता कवन रूपा म्हजी उतरां ॥
ही निसर्गचित्रे शब्दांत उतरवताना वेळुस्करांची हुकमी लेखणी नवनव्या चपखल नादमयी शब्दांचे मोती दणादण घरंगळत जाते. या शब्दांची नजाकत काही और आहे. मनाची अस्वस्थता वर्णिताना ‘मन सळाबळा जाला’ असा शब्द केवळ त्यांच्यासारख्या भावकवीलाच सुचू शकतो. कविता अशी त्यांना ‘शब्दुलयत्’ जात असे. वेळुस्करांची कवितेची ही नादमयता आणि तिची लय मोहक आहे. ‘‘पिसोळ्याच्या पाखा, उडो नाका, उडो नाका | दोळ्यांतुल्या दुका, झडों नाका झडों नाका’’ म्हणत तिने व्यथा वेदनांना मागे सारत जीवनाचेच गाणे गायिले. ‘म्हाका तारे जाय, गिरे जाय, सृश्ट जाय, इश्ट जाय, दृश्ट जाय, म्हजेकडें एक मळब आसा’ म्हणत ह्या कविराजाने आपल्या कवितेच्या आकाशाला नवी झळाळी दिली. वेळुस्करांची प्रतिभा ही सौंदर्यासक्त आहे. तिला विरुपाचे वावडे आहे. पाळें शिरदोनच्या रमणीय परिसरातले ‘दोंगोर पर्वत निळ्या कुपांचे, सागर साठे निळ्या तळ्यांचे’ तिच्या कवितेला अनुकूल वातावरण निर्मित गेेले. त्या लाटांवर स्वार होत वेळुस्करांची कविता लहरत विहरत निघाली. लोकवेदातली गावकाराची सून ‘आंगणी नाचता मोर मोरया’ मधून मोराशी नाते जुळवताना ‘सूर – संगाच्यो घालून आलेटी, फुलोवन नक्षत्रांचो कुचो फुलांटी | तशी नदर तिची आयली ताचे भेटी’ अशी त्यांना भेटली. त्यांच्या ‘सावुलगोरी’ ला साहित्य अकादमीने सन्मानाचे कोंदण दिले आणि या कोंकणी कवीची काव्यप्रतिभा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. असे सन्मान, पुरस्कार चालून येतात तेव्हा अनेकांची प्रतिभा आटत जाते, परंतु वेळुस्करांनी तसे होऊ दिले नाही. त्यांची लेखणी नेहमीच बहुप्रसवा राहिली. कविता, बालकविता, बालनाट्य, कादंबरी, ललित निबंध, समीक्षा, अनुवाद, वृत्तपत्रीय स्तंभलेखन अशी चौफेर दौडत राहिली. ‘नवप्रभे’ ने त्यांना मराठीतून गद्यलेखनास प्रेरित केले, तेव्हा आमचे ‘अंगण’ त्यांच्या स्मरणव्याकूळ आठवणींच्या स्तंभाने भरून निघाले. ‘सृजनाच्या अंतरंगांत’ हा त्यांचा २१ लेखांचा संग्रह त्यांच्या गुणवत्तापूर्ण मराठी लेखनाची साक्ष देतोच, परंतु अजूनही अप्रकाशित असलेले त्यांचे नवप्रभेतले लेख संकलित होणे आवश्यक आहे. वेळुस्करांची ओळख बहुभाषाकोविद अशी होती हे तर सर्वज्ञात आहे. कोकणी, मराठी, हिंदी, बंगाली, पोर्तुगीज अशा अनेक भाषांमधल्या संचिताची त्यांना ओढ होती. त्यातूनच तुकारामांपासून टागोरांपर्यंत आणि योगी अरविंदांपासून भारतेंदु हरिश्चंद्रांपर्यंतच्या साहित्यकृती त्यांनी कोकणीत आणल्या. तुकोबांच्या ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ ह्या आकांक्षेचे सार वेळुस्करांनी ‘तुका म्हणं मुक्ती | केली रे व्हकल, खेळीमेळी धुकल, दीस चार’ अशा चपखल शब्दांत मांडले. त्यांच्या स्वतःच्या कवितांचा ‘समुद्रमुद्रिका’ हा देखणा हिंदी कवितासंग्रहही निघाला. ‘‘मालणी गे हात तुजे हात न्हु गे हाते | फुलरंगी फुलवंते तुजे केसरीच नाते | दोळियांच्या जळा तुज्या मळबाचे तळ | मनाचिया नाचा म्हज्या तुज्या वठांचे गे बळ’’ अशा लयदार ओळींच्या माळा लीलया गुंफणार्‍या या कवीनेच ‘म्हजो हातूच म्हाका असो सोसना सोसना, त्या वास्तवाच्या वसना पिनूं कसो’ म्हणत ‘कुडी हुलांडपाची तोर्णां’ बांधली, यादींची जोडवीं जाळत तन – दीपरत्नोत्सव साजरा करीत ‘तनरज्योती’ प्रज्वलित केल्या. कवीच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘कोणाचेच अंत फाल्यां उरचे ना अंत, तांचे जातले अनंत’’ वेळुस्करांची कविता आज त्यांच्यानंतरही अशी अनंत होऊन उरली आहे!