ब्रेकिंग न्यूज़

अस्तनीतले निखारे ः ‘ब्राह्मोस’ मधले हेर

निशांत अगरवाल आणि अच्युतानंद मिश्रा या दोन हेरांच्या अटकेमुळे आयएसआयच्या भारतामधील एका मोठ्या रिंगचा पर्दाफाश होण्याच्या शक्यता आहेत. तथापि, पाश्‍चात्य देशांसाठी हेरगिरी करणार्‍या एका बीएसएफ सैनिकाला दुसर्‍या शास्त्रज्ञाचे नाव माहिती असावे आणि त्यांनी दूरच्या गावातील एका भलत्याच प्रयोगशाळेत काम करणार्‍या शास्त्रज्ञाचे नाव जाहीरपणे घ्यावे ही या घटनेतील धक्कादायक बाब आहे. त्यांना पकडण्यात यश आले असले तरी अशा हेरांना शिक्षा व्हायला प्रचंड वेळ लागतो. त्यासाठी भारतात मिलिटरी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना होणे आवश्यक आहे.
नागपूरच्या ब्राह्मोेस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत निशांत अगरवालच्या अटकेमुळे संवेदनशील संरक्षणसंबंधी गुप्त गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी नवीन रिक्रूटस् आणि जे संरक्षणदलांमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना प्रेमोद्योतक मायाजालात (हनी ट्रॅप) खेचण्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणप्रणालीची कल्पना करता येते. तसे पाहिले तर संरक्षण दलांमध्ये प्रवेश करतांच हेरगिरीला उद्युक्त होणार्‍या लोकांची भरती करण्यासाठी अशा रिक्रूटमेंट करणारे एजंट धडपडत असतात. निशांत अगरवालच्या अटकेमुळे पाकिस्तानी इंटर सर्व्हिस इंटलिजन्स एजन्सीतर्फे (आयएसआय) भारतीय नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचण्याच्या संंबंधातील भारतीय कमकुवतपणा स्पष्ट होतो. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखाच्या म्हणण्यानुसार निशांतच्या अटकेमुळे आयएसआयच्या भारतामधील वाढत्या प्रभावाची कल्पना येतेे आणि त्यामुळेच याकडे गांभीर्याने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. तसे त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला देखील कळवले आहे.
काही महिन्यांपूर्वी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) मेवत निवासी अच्युतानंद मिश्राला दिल्ली जवळील नोएडा वसाहतीमधून अटक करण्यात आली होती. आयएसआयच्या एका मॉडेलने आपल्या प्रेमोद्योतक मायाजालात अडकवून त्याच्याकडून त्याच्या युनिटची ऑपरेशनल तैनाती आणि बीएसएफ पोलिस ऍकॅडमीबद्दल संवेदनशील माहिती घेतली होती असेही मत युपी एटीएस चीफनी व्यक्त केले. मिस्रा आणि अगरवालला आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी आयएसआयने नेहा शर्मा आणि पुजा रंजन या खोट्या नावांनी फेसबुकवर उघडलेल्या दोन अकाउंटसचा वापर केला. आपण एका भारतीय संरक्षण वार्ताहराशी बोलतो आहोत अशा भ्रमात असलेल्या अच्युतानंद मिश्रांनी सर्व अंतर्गत गोपनीय गोष्टींची वाच्यता त्या तथाकथित वार्ताहारापाशी केली. या उलट फेसबुकवरील आपल्या अत्यंत निष्काळजी वर्तनाने निशांत अगरवाल आयएसआयचे सुलभ, सोपे लक्ष्य बनला. सेंट्रल इंटेलिजंस ब्युरोनुसार (आयबी) इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या आयएसआयच्या या विशिष्ट मॉडेलनी आपल्या कार्यपद्धतीने भूतकाळात अशा अनेक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून, भारतीय संरक्षण दल आणि भारतीय सेनेची सीमेवरील तैनाती आणि ऑपरेशन्सविषयी माहिती घेतली आहे. आपल्या रिक्रूटमेंटदरम्यान विविध आर्मी कॅम्प्समध्ये गेलेल्या आणि आर्मी रिक्रूटमेंट प्रणालीबद्दल काही संवेदनशील महिती आयएसआयला पुरवल्याच्या आरोपाखाली आयबीने सेनेत प्रवेशासाठी आतुरलेल्या रोहतक निवासी गौरव कुमारला २०१७ मध्ये अटक केली होती. त्यानेदेखील फेसबुकवर दोन महिलांशी संबंध स्थापन केले होते आणि त्यांना माहिती दिली होती.
आयएसआयची भारतामध्ये हेरांचे जाळे उभे करण्याची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. एका सुत्रानुसार, भारतात सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्युच्या माध्यमातून संरक्षणदलांमध्ये अधिकारी म्हणून कोण जाणार आहे किंवा कोणाला संरक्षणदलांमध्ये सैनिक म्हणून जायचे आहे याबद्दलची माहिती काढण्याची जबाबदारी २०१७ मध्ये इस्लामाबादमधील वरील विशिष्ट मॉडेलना दिल्या गेल्या. अशा किमान ५० ते १०० तरुण संभाव्य लक्ष्यांना (पोटेंशियल रिक्रूटस्) शोधून त्यांच्याशी संधान बांधून त्यांची वागणूक, आवड निवडआणि सोशल मीडिया व इंटरनेट पॅटर्नचा अभ्यास करण्याची आणि संरक्षणदलांमध्ये जाण्याआधी त्यांना रिक्रूट करण्याची जबाबदारी आयएसआयने आपल्या भारतीय एजंटस्‌च्या जाळ्याला (इंटलिजंस नेटवर्क) दिली. असे केल्यामुळे संरक्षणदलांमध्ये प्रवेश करताक्षणीच त्यांच्यासाठी हेरगिरी सुरू करणारे हेर आयएसआयला मिळणार होते. इतर हेरांसोबत रिक्रूटमेंट कॅम्पमध्ये चालणार्‍या ऍक्टिव्हटीज्‌चे व्हिडियोज् आपल्या मोबाइल कॅमेर्‍यामध्ये काढण्याची आणि ऑनलाईन चॅटच्या माध्यमातून ती माहिती त्याचे हँडलर्स नेहा शर्मा आणि पुजा रंजनला देण्याची कामगिरी गौरव कुमारला देण्यात आली होती. यामुळे किती रिक्रूटस् भरती झाले, त्यांची रिक्रूटमेंट स्ट्रॅटॅजी काय आहे याची माहिती आयएसआयला मिळत गेली. मात्र, आपली कामगिरी बजावतानाच गौरव कुमार पकडला गेला असे त्याच्या तपासणीमध्ये आढळून आले. गौरव कुमारने किमान १८ रिक्रूटमेंट रॅलीज्‌मध्ये भाग घेऊन ती माहिती त्याच्या पाकिस्तानी हँडलर्सला दिली आणि त्यासाठी त्याला २० लाखांपेक्षा जास्त रकम देण्यात आली असे त्याच्या बँक खात्यावरुन आढळून आले.
सूत्रांनुसार,आयबी आणि एटीएसनी मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अशा अनेक मॉड्युल्स ध्वस्त केल्या आहेत. २०१६ मध्ये अलाना हॅमियर आणि शकूर सूरमा यांना गुजरातच्या भूजमध्ये अटक करण्यात आली. अलाना हॅमियर २००४ पासूनच पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपरकार येथील १७ वर्षीय तरुणी हेनाच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी हॅमियरनी अनेकदा पाकिस्तानच्या वार्‍या केल्यात. हॅमियर जन्मजात अशिक्षित असल्यामुळे त्यांनी शकूर सूरमाला आपल्या जाळ्यात ओढले आणि दोघे मिळून त्या क्षेत्राचे नकाशे, स्केचेस आणि सामरिक व आर्थिक माहिती आपल्या हँडलरला देऊ लागले. हँडलरची ओळख हेनानीच करून दिली. काही दिवसांनंतर हॅमियरला कळले की हेना आयएसआयची एजंट आहे पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अशाच प्रकारे मुलीच्या प्रेमाचे प्रलोभन दाखवून आयएसआयने अमृतसर, पंजाबमधील शीख रेजिमेंटच्या एका कोवळ्या तरुण सैनिकाला आपल्या प्रेमजालात खेचले आणि कँटॉन्मेंटची सर्व पिक्चर्स व माहिती मिळवली. अंतत: जरी तो सैनिक पकडला गेला असला तरी पण बरेच डॅमेज होऊन गेले होते. या हेरालादेखील प्रचंड प्रमाणात पैसा देण्यात आला हंोता. मागील काही काळापासून केंद्रीय आयबी तरुणांची रिक्रूटमेंट करण्यासाठी आयएसआय व आयसीसने सोशल मिडियावर तयार केलेल्या फेक अकाउंटस्‌च्या शोधात आहे.
नागपूरच्या ब्रम्होस केसमधील नेहा शर्मा आणि पुजा रंजन यांचे सोशल मीडियावरील अकाऊंट इस्लामाबादचे होते. संरक्षण क्षेत्रातील सैनिकांना आपल्या प्रेमोद्योतक मायाजालात अडकवण्यासाठी सोशल मीडियावर हजारो फेक अकाऊंटस् उघडण्यात आले आहेत. एका कॅज्युअल चॅटद्वारे सुरू झालेले डिजिटल संभाषण शेवटी पैशाची लालूच किंवा मदनिकेच्या प्राप्तीवर येऊन थांबते आणि लक्ष्याभोवती प्रेमोद्योतक मायाजालचा फास कसला जातो. भारतीय वायुदलाच्या ग्रुप कॅप्टन अरुण मारवाच्या संबंधातही हेच झाल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हूकअप या चॅट साईटवर तो आयएसआयशी वायुदल प्रशिक्षण व युद्धाभ्यासाची माहिती शेयर करत असे. या चॅट साईटमध्येतुम्ही लॉग आऊट झालात की सर्व लिखीत संभाषण (कॉन्व्हर्सेशन्स) आपोआप पुसली जात. हूकअप ही आयएसआयची आवडीची (फेवरिट) साईट आहे; कारण त्यामध्ये एकाच पासवर्डने मारवा व आयएसआयचे लॉग इन होत असे. अरुण मारवासाठी किरण रंधावा आणि महिमा पटेलच्या नावाने फेक अकाऊंटस् उघडण्यात आले होते. सोशल मीडियावरून ते व्हॉटस् ऍपवर गेलेत आणि तेथून किरण आणि महिमा त्याला हूकअप साईटवर घेऊन गेल्या. वायुदलाचे आजतायगात झालेला सर्वात मोठायुद्धाभ्यास ऑपरेशन गगन शक्ती आणि वायुदल व सेनादलाचा एकत्र युद्धाभ्यास यांचे किमान १२ डॉक्युमेंटस् त्यांनी हूकअपवर अपलोड केले असावेत असा अदमास आहे.‘एक्सप्लीसिट सेक्स चॅट आणि एक्सचेंज ऑफ सिक्रेट इंफर्मेशन’चे हे डोळे फाडणारे उदाहरण आहे.
उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबीनुसार आयएसआयने ब्रम्होस एरोस्पेसमध्ये निशांत अगरवालसारखे आपले अनेक एजंटस् घुसवलेले आहेत. अगरवालच्या जोडीला नेहा शर्मा आणि पुजा रंजनाच्या जोडगोळीने आपल्या मायाजालात अडकवलेले आणखी दोन शास्त्रज्ञ इंटलिजंस एजंसींच्या रडारवर आहेत. या एजन्सींनुसार रशियाच्या मदतीने चालवलेल्या ब्रम्होस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये केवळ पाकिस्तानच नाही तर अमेरिकाही हेरगिरी करते आहे आणि निशांत अगरवाल आयएसआयबरोबरच अमेरिकन हँडलर्सनादेखील माहिती पुरवत होता. ब्रम्होस एरोस्पेसच्या नागपूर आणि पिलानी युनिटमध्ये तो नवीन प्रोजेक्टचा मुख्य शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याच्या अमेरिकन हँडलर्सनी त्याला अमेरिकेत ८०,००० डॉलर्सच्या नोकरीचे आमिष दाखवले आणि तो पोपटासारखा बोलू लागला. नेहा शर्मा आणि पुजा रंजनानी त्याच्याकडून रशिया व भारताच्या समन्वयाने आपल्या येथेच विकसित होत असलेल्या आणि पहिले यशस्वी उड्डाण फ्लाईट केलेल्या सीकर टेक्नॉलॉजीबद्दलची माहिती घेतली. सिकर टेक्नॉलॉजीद्वारे क्षेपणास्त्राची बिंदू मार अचुकता (ऍक्युरसी) जोखता येते आणि त्यात सुधारणा करता येऊ शकतात. निशांतने काय व किती माहिती दिली असेल याचा अचुक अंदाज लावणे कठीण आहे. निशांत अगरवालच्या लॅपटॉपमध्ये लाल टॉप सिक्रेट मार्किंग असलेल्या अतिशय संवेदनशील फाईल्सची पीडीएफ कॉपी आढळली आहे. निशांत अगरवाल आणि अच्युतानंद मिस्राच्या अटकेमुळे आयएसआयच्या भारतामधील एका मोठ्या रिंगचा पर्दाफाश होण्याच्या शक्यता आहेत.
संरक्षण मंत्रालयाखाली कार्यरत असणार्‍या प्रत्येक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनमध्ये प्रयोगशाळा व्हिजिलंस विंग आणि स्टेट इंटलिजंस ब्युरो संयुक्तपणे तेथे कार्यरत कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर करडी नजर ठेवतात. आरडीओ तांत्रिक विद्यालयांबरोबर काम करत असल्यामुळे त्यांच्या शास्त्रज्ञांवरदेखील यांची करडी नजर असते. लॅबॉरेटरीला भेट देणार्‍या पाश्‍चात्य शास्त्रज्ञांचीदेखील कसून तपासणी केल्या जाते. शिवाय या दोघांनी गोळा केलेली माहिती केन्द्रिय आयबीला दिली जाते. असे असतांनादेखील निशांत अगरवाल आयएसआयसाठी एक सॉफ्ट टार्गेट ठरला. पाश्‍चात्य देशांसाठी हेरगिरी करणार्‍या एका बीएसएफ सैनिकाला एका दुसर्‍या शास्त्रज्ञाचे नाव माहिती असावे आणि त्यांनी दूरच्या गावातील एका भलत्याच प्रयोगशाळेत काम करणार्‍या शास्त्रज्ञाचे नाव जाहीरपणे घ्यावे ही या घटनेतील धक्कादायक बाब आहे. शत्रू देशांचे हँडलर्स कधीच एका हेराला दुसर्‍या हेराचे नाव सांगत नाहीत पण या घटनेत बीएसएफच्या मिस्राला अगरवालचे नाव व ठिकाणा इतकेच नव्हे तर तो करत असलेल्या हेरगिरीची माहिती असणे आणि त्याने ती तपासणी अधिकार्‍यासमोर उघड करणे ही आयएसआयनी केलेली अक्षम्य चूक आहे किंवा दिसत आहे. त्याहून मोठे पाश्‍चात्य हेरगिरीचे वर्तुळ भारतात कार्यरत आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेची व्हिजिलंस विंग आणि राज्य व केन्द्रातील आयबीचे हे फार मोठ अपयश आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशा हेरांना पकडल्यावर त्यांना शिक्षा व्हायला प्रचंड वेळ लागतो. त्यासाठी भारतात मिलिटरी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना होणे आवश्यक आहे. हेरगिरी व दहशतवादी कृत्यांचे खटले अशा न्यायालयांमध्येच चालवून दोषींना जास्तीत जास्त सहा महिन्यांमध्ये शिक्षणप्रद शिक्षा (एक्झाम्पलरी पनिशमेंट) व्हायलाच हवी. इतकेच नव्हे तर त्याची सर्व संपत्तीही जप्त झाली पाहिजे. दहशतवादी व देशद्रोही हेरांना त्वरित कडक शिक्षा झाल्या शिवाय या अशा गोष्टींना आळा बसूच शकणार नाही. शिवाय सोशल मिडियावरील इंटलिजंस एजंसींचा फास अधिक तीव्रतेने आवळला गेला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार विरुद्ध देशहिताची ही लढाई जिंकण्यासाठी काही मानवाधिकारांच हनन झाले तरी त्यात खेद करण्याच कारण नसावे.