अवचिता नव्हे अपरिचिता परिमळू…

अवचिता नव्हे अपरिचिता परिमळू…

 

  •  जनार्दन वेर्लेकर

राष्ट्रीय एकात्मतेचे सुरेल प्रतीक (इति. डॉ. सी. डी. देशमुख) असा ज्यांचा कीर्तिसुगंध त्या लतादीदी आज ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण’ हे त्यांच्याबाबत अक्षरशः खरे आहे. एक प्रकारच्या ममत्वाने त्यांच्यावर सर्वांना आपल्या प्रेमाचा- जवळीकीचा अधिकार गाजवावासा वाटतो. यांतून अफवा, तिखटमीठ लावून रचलेल्या ऐकीव आणि सांगोवांगीच्या आख्यायिका, गैरसमज, आरोप- प्रत्यारोप आणि फजिती यांना अंत नसतो. सर्वांना ओळखीच्या, सुपरिचित वाटणार्‍या लतादीदीचं अपरिचित दर्शन मला मात्र त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमुळे घडलं. माऊलींच्या शब्दांत ‘अवचिता परिमळू…’ असे हे दर्शन. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादरूपाने वाचकांना वाटायचा हा अल्पमतीने केलेला प्रयत्न…

भिडस्त स्वभावामुळे लतादीदीची सपशेल विकेट उडाली त्याची ही गोष्ट. एक नवोदित गायिका एचएमव्ही स्टुडिओमध्ये आपलं गाणं रेकॉर्ड करत होती. त्या गायिका जरा ओळखीच्या होत्या. दीदीला तिथून उठून जाणं प्रशस्त वाटेना. बाईचं गाणं यथातथाच होतं. अगदीच असह्य झाल्यामुळे दीदी रेकॉर्डिस्टना म्हणाली, ‘या बाई काही फार चांगलं गात नाहीत हो’. हे ऐकून तिथे उभे असलेले एक ग्रहस्थ जवळ आले व म्हणाले- ‘‘अहोऽ ती माझी बायको आहे.’’ दीदीला घोटाळा लक्षात आला. सावरून घेत ती उत्तरली- ‘‘नाहीऽ तसं नाही. बाईंचा आवाज आणि गाणं तसं चांगलंच आहे, पण चाल चांगली असती, तर हे गाणं अजून छान झालं असतं. नाही?’’ यावर ग्रहस्थ थोड्या नाराजीनं म्हणाले, ‘‘ही चालही माझीच आहे.’’ आता आली का पंचाईत. तरीही दीदीने माघार घेतली नाही. ‘‘अरे वा! हो का? तशी चालही खरं म्हणजे चांगलीच आहे. पण काव्य? त्यात काही रस नाही हो. काव्य बरं असेल, तरच चाल सुंदर होणार ना. तुमचा काय दोष? ते चांगलं असतं तर तुमच्या चालीला आणि बाईंच्या आवाजाला न्याय मिळाला असता. आता मात्र दीदीला वाटलं आपण बाजी जिंकली. पण एव्हाना ते ग्रहस्थ अगदीच ओशाळे झाले. तरीही धीर एकवटून म्हणाले- ‘‘दीदी, हे काव्य मीच लिहिलं आहे.’’ बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना तशी दीदी क्लीन बोल्ड झाली एवढं खरं.

क्रिकेटप्रेमी लतादीदीचा कैवारी गावसकर

भारतीय टीम पाकिस्तानला खेळायला गेली होती. मॅच बघायला मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहॉं आली होती. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी आणि वलयांकित गायिका. फाळणीनंतर नूरजहॉं पाकिस्तानात गेली. मॅचनंतर खेळाडूंशी तिची औपचारिक ओळख करून देण्यात आली. सुनील गावसकर तेव्हा यशाच्या शिखरावर होते. त्यांचा मोठेपणा सांगून तिच्याशी ओळख करून देण्यात आली पण त्यावर नूरजहॉं म्हणाली- ‘‘कोण गावसकर? मी फक्त झहीर अब्बासना ओळखते.’’ लताभिमानी गावसकरनी ते लक्षात ठेवलं. पुढे काही वर्षांनी एका कार्यक्रमासाठी नूरजहॉं भारतात आली; तेव्हा तिची गावसकरांशी ओळख करून देताना ते एवढंच म्हणाले- ‘‘कोण नूरजहॉं? मी तर फक्त लतादीदींनाच ओळखतो’’.

सुनील गावसकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली त्यांचे आवडते खेळाडू. सौरव गांगुलीनी जेव्हा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला, तेव्हा दीदीनं त्यांना फोन करून निर्णयाचा फेरविचार करायला सांगितलं होतं. सचिन तेंडुलकर तर तिला मुलासारखेच. त्यांना गाण्यात रुची तर दीदीला क्रिकेटमध्ये. आयपीएलची फायनल मॅच बघायला सचिन प्रभुकुंजमध्ये आले होते. हा प्रसंग अविस्मरणीय होता. प्रभुकुंजमध्ये दोन भारतरत्न शेजारीशेजारी बसून मॅच बघत होते. प्रत्येक बॉलवर हसतखेळ चर्चा रंगली होती. टीव्हीवर आणि टीव्हीसमोर दोन मॅचेस एकाच वेळी रंगात आल्या होत्या.

कुंदनलाल सैगलशी मी लग्न करणार

सैगल लतादीदीचे आवडते गायक. मी मोठी झाल्यावर त्यांच्याशीच लग्न करणार असा तिचा बालहट्ट. मा. दीनानाथांना सैगलचे गाणे मनापासून आवडायचे. मंगेशकर कुटुंबाचे नाना चौकात (मुंबई) वास्तव्य असताना दीदींनी एक रेडिओ विकत घेतला. रेडिओवर पहिलीच बातमी ऐकायला मिळाली ती सैगल यांच्या निधनाची. दीदींना रेडिओ अपशकुनी वाटला. त्यांनी लागलीच तो विकून टाकला.

सैगलबद्दल एका मुलाखतीत त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत- ‘सैगलसाहेबांकडून खूप शिकले. त्यांना भेटायचं भाग्य मला कधी लाभलं नाही. परंतु त्यांचं गाणं मी खूप ऐकलं आहे. त्यांच्यामुळे मी फार प्रभावित झाले. त्यांची आंगठी पण मी जपून ठेवली आहे.’ के. एल. सैगल यांच्या मृत्यूनंतर बर्‍याच काळानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून सैगल यांची आंगठी लतादीदींनी मागून आणली. या अमूल्य भेटीबद्दल सैगल कुटुबियांच्या त्या आजपर्यंत ऋणी आहेत. त्या म्हणतात- ‘‘सैगल साहेबांचे स्पष्ट उच्चार आणि त्यांच्या आवाजाची जबरदस्त झेप विलोभनीय होती! गळ्याची किती तयारी होती! पण त्या तयारीचं दिखाऊपण त्यांच्या गायकीत बिलकूल नव्हतं. ‘‘मै क्या जानू क्या जादू है, इन दो मतवाले नैनों मे…?’’ यात ‘क्या’ शब्दावर त्यांनी मोठी मुश्कील तान घेतली आहे, परंतु ऐकताना ती क्लिष्ट वाटत नाही…. आपण गायलो तरच त्याचा पत्ता लागतो.

दीदीचा रुद्रावतार

दीदीची एक सवय आहे. तिच्या एखाद्या वस्तूची कोणी भरमसाठ स्तुती केली तर ती वस्तू लगेच प्रशंसकाला देऊन टाकायची. ‘महल’मधील गाजलेल्या गीताच्या पहिल्याच बैठकीच्या वेळी गीतकार नक्शब यांनी तिच्या सुंदर फौंटनपेनची खूप स्तुती केली. सवयीने तिने त्यांना म्हटलं, ‘‘घ्याना तुम्ही ठेऊन घ्या हे.’’ उदारपणे पेन दिलं मात्र त्यावर आपलं नाव कोरलं आहे हे ती विसरून गेली. तो गीतकार सुसंस्कृत नाही हे तिला ठाऊक नव्हतं. एका अपात्र इसमाला आपण पेन दिलं हे तिला फार उशिरा कळलं. तिचं नाव कोरलेलं ते पेन नक्शब सर्वांना दाखवीत होते आणि ‘‘आमच्या दोघात काहीतरी खास ‘गुपित’ आहे’’ अशी हवा पसरवीत होते.
एका ध्वनीमुद्रण प्रसंगी या गीतकाराने आपल्या तथाकथित प्रेमसंबंधांची प्रदर्शन करण्याची संधी साधली. दीदी नौशाद यांचे गाणे ध्वनिमुद्रित करीत होत्या त्यावेळी या गीतकाराच्या रोमँटिक मूडने उचल खाल्ली होती. दीदी पेचात सापडली होती. पेन हिसकावून घेणे शक्य नव्हते.

एकदा हे प्रेमवीर चक्क दीदींच्या घरी नाना चौकात येऊन थडकले. दीदी बहिणींबरोबर अंगणात खेळत होती. तिला बहिणींच्या समोर तमाशा नको होता. दीदी प्रसंगावधान राखून त्याला रस्त्यावर घेऊन गेली. रागाने साडीचा पदर कमरेत खोचला व कडाडली- ‘‘आधी न विचारता इथे येण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? पुन्हा जर का इथे नजरेस पडलात तर तुकडे तुकडे करून गटारात फेकून देईन. मी मराठा स्त्री आहे हे ठाऊक आहे ना?’’
एवढ्यावर न थांबता दीदीने संगीतकार मास्टर खेमचंद प्रकाश यांच्याकडे या गीतकाराची तक्रार केली. त्यांनी त्याला दम भरला. ते संतापाने थरथरत त्याच्यावर ओरडले. ‘‘समजतो काय स्वतःला?’’ त्यांनी तात्काळ दीदीचं पेन मागितलं. त्याच्या हातातून हिसकावून ते दीदीला परत केलं. सगळ्या भांडणाला कारणीभूत ठरलेलं ते पेन दीदीने ग्रँट रोडच्या ऐवजी चर्नी रोडला उतरून चौपाटीवरून सर्व जोर लावून समुद्राला अर्पण केले. कानाला खडा लावला. यापुढे पार्कर पेन घ्यायचं नाही आणि घेतलंच तर त्याच्यावर आपलं नाव कोरायचं नाही.
वेस्ट इंडिज दौर्‍यात दीदीचा वाढदिवस

सोळा देशातील ४२ शहरात ११३ कार्यक्रम सादर करून दीदीने जगातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे. वेस्ट इंडिजमध्ये अशाच एका दौर्‍यात दीदीचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. लतादीदी राहात असलेल्या हॉटेलमधील आलिशान हॉलमध्ये सगळेजण जमले. प्रत्येकाने जेवणापूर्वी लतादीदींबद्दल दोन दोन मिनिटे बोलायचं असं ठरलं. कोणी शेर म्हणून दाखवला. कोणी म्हणालं- ‘‘मला दोन मिनिटं का बोलायला सांगितलंय, माझ्या आयुष्यातील दोन वर्षं लतादीदीना द्यायला का नाही सांगितलं?’’ एकाने धमाल चुटकुला ऐकवला व आपल्याला तो लतादीदींनीच सांगितल्याचा गौप्यस्फोट पण केला.

सतारवादक जयराम आचार्य यांची बोलायची पाळी आली. एक एक शब्द मोजून मापून उच्चारीत ते म्हणाले- ‘‘आज दीदींचा जन्मदिन आहे, हे सर्वजण जाणतातच. याकरिता माझी तुम्हाला विनंती आहे की, आपण सर्वांनी उभं राहून दोन मिनिटांसाठी मौन पाळावं!’’ सगळे अवाक् झाले. नजरा फाडफाडून एकमेकांकडे पाहू लागले. परंतु कोणी विरोध करायच्या आधी, आपापल्या जागी उठून उभं राहण्याची सामूहिक क्रिया सुरुसुद्धा झाली होती. लतादीदींच्या ५१ व्या वाढदिवशी दोन मिनिटं मौन पाळण्यात आलं व त्यात लतादीदीपण सामील झाल्या.
‘‘खरंच, वक्त्याच्या शब्दाला कोण नावं ठेवणार?’’ बुफे डिनर घेताना लतादीदी खळखळून हसल्या व उद्गारल्या- ‘‘हा आज एक नवा पायंडा मी पाडला आहे. माझ्यासाठी पाळल्या जाणार्‍या मौनात मी स्वतःच सामील झाले होते!’’

माईचा हट्ट पुरवला

माई पहिल्यांदा गरोदर राहिल्या तेव्हा मा. दीनानाथरावांना पुत्ररत्न होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अपेक्षेने त्यांनी नाव ठरवलं होतं ‘हृदयनाथ’. परंतु कर्क राशीत मुलगी झाली तेव्हा नाव ठेवलं ‘हृदया’ आणि पाळण्यातलं नाव ‘हेमा’. तेव्हा माई म्हणाल्या, ‘‘पुढं मुलगा होईल तेव्हा त्याचं नाव ठेवा ‘हृदयनाथ’, मी तर हिला ‘लता’च म्हणणार. लता मंगेशकर हे नाव सर्वतोमुखी होईल हे बाबांऐवजी माईंनीच हेरून भविष्यवेत्त्या आपल्या मालकांवर त्यांनी मात केली एवढं खरं.
माई एकदा दीदीला सहजच म्हणाली, ‘‘लताऽऽ मला एकदा त्या इंग्लंडच्या राणीला भेटायचं आहे गं.’’
दीदीसुद्धा बाबांचीच मुलगी. हट्ट पुरवण्यात तिचा हात कुणी धरु शकणार नाही. आणि त्यातून हा तर माईचा हट्ट. दीदीनं ठरवलं ‘इंग्लंड’च्या राणीला माझ्या आईला भेटवायचं आहे.

पण हे काम सोपं नव्हतं. अनेक सरकारी सोपस्कार, परवानग्या, कागदपत्र तर असंख्य. सारी दिव्य पार पाडून तिथे पोहोचलो, तरी भेट मिळायची शक्यता राजलहरीवर अवलंबून. दीदीने हे सारं जुळवून आणलं. लंडन माईचं आवडतं ठिकाण. सगळं कुटुंब ठरल्या दिवशी सकाळी राणीच्या राजवाड्यावर पोहोचलं. राजवाड्याच्या प्रशस्त बगिच्याच्या हिरवळीवर ही भेट झाली. राणीबरोबर शाही चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सात समुद्रांवर एकेकाळी राज्य करणार्‍या इंग्लंडच्या राणीला सात सुरांवर राज्य करणार्‍या सम्राटाची पत्नी भेटली; जिला इंग्रजीचा गंध नव्हता. रक्तात कोणताच राजेशाही वारसा नव्हता. थाळनेरमध्ये जन्माला आलेली एक भारतीय खेडवळ स्त्री इंग्लंडच्या राणीला भेटली. तिच्याशी हस्तांदोलन केलं. दिवंगत स्वरसम्राटाचा वारसा तिच्या लेकीने निभावला. इंग्लंडची राणी एका स्वरराज्ञीच्या मातेला भेटली.

माई दीदीकडे कृतकृत्य होऊन पाहतच राहिली. मायलेकी धन्य झाल्या.

आयुष्यात प्रथमच पैसे मागते आहे

गाजावाजा न करता आपल्या नावाचा, अधिकाराचा आणि प्रतिष्ठेचा सदुपयोग दीदींनी बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’च्या मदतीसाठी केला. या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदित्य बिर्ला संकुलातील संगीत कला केंद्राचं सहाय्य घेतलं. आपल्या जनसंपर्काचा उपयोग करून अधिकाधिक निधी जमवण्याचं लक्ष्य त्यांनी ठरवलं. त्या सर्वप्रथम उद्योगपती आदित्यकुमार बिर्ला यांना भेटावयास गेल्या. ‘‘आयुष्यात प्रथमच पैसे मागते आहे… पण स्वतःसाठी नाही.’’ काही मिनिटातच चेकवर एक सहा आकडी रक्कम लिहिली जाऊन त्यावर सहीदेखील झाली! तेथून सरळ धीरु भाई अंबानींच्या आलिशान कार्यालयाचा जिना चढल्या.

देणगीचं कारण आणि अन्य चर्चा झाल्यावर धीरुभाईंनी ज्येष्ठांना सन्मान करणारा प्रश्न विचारला, ‘बिर्लाजींनी किती दिले? त्यांच्यापेक्षा जास्त देणं मला शोभणार नाही.’’ पुन्हा एकदा चेकबूक उघडलं गेलं व आणखी एक सहा आकडी रक्कम त्यावर लिहिली गेली. वालचंद आणि गोदरेज, गोएंका आणि अजय गरवारे या सर्वांनी पैसे दिले. आनंदाने दिले. तेवढ्याच उत्साहाने रसिकांनी महागडी तिकिटेही खरीदली, त्यांना खरेदी करायला लावली. मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर २८ एप्रिल १९८४च्या सायंकाळी त्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी पददलितांसाठी अविश्रांत झिजणार्‍या बाबा आमटे यांच्याकडे ३४ लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला.

पितृऋण फेडायचं बीज दीदींच्या मनात याच अनुभवातून अंकुरलं नसेल? लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन या संस्थेची स्थापना ही एका सेवाभावी महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात. ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’साठी पायाभूत संस्था म्हणून फाउंडेशन कामाला लागलं. उषानं आणि बाळनं या कामाला वाहून घेतलं. पुण्यात देशातलं अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं. सौदी अरेबियाचे सौद बहावान यांचा विशेष उल्लेख करायलाच हवा. पिढ्यान् पिढ्यांचे गर्भश्रीमंत, पण त्यांची खरी श्रीमंती मनाची. पहिलं प्रेम दीदींच्या सुरांवर. त्यांनी दीदींच्या एका शब्दाखातर हॉस्पिटलला काही कोटी रुपयांची मदत केली. अनेक अद्ययावत वैद्यकीय यंत्रं पुरवली. हॉस्पिटलमधल्या एका दालनाला त्यांचं नाव दिलं आहे. १०३ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या रुग्णालयात ४० टक्के रुग्णांचा इलाज मोफत केला जातो.

माझं गाणं ही संगीताची साधना

दीदींचे शब्द आहेत- ‘एक माझीच माझ्याबद्दलची तक्रार आहे. माझा रियाझ कमी झाला आहे. पण अजूनही शिकायची उर्मी तितकीच तीव्र आहे.’ याच सर्वोत्कृष्टतेच्या ध्यासामुळे दीदी स्वतःला संगीताची एक नम्र उपासक मानते. गीत गाताना, स्टुडिओत ध्वनिमुद्रण करताना त्या कधीही पायात चपला घालीत नाहीत. मंगेशकर भावंडे त्यांचाच कित्ता गिरवत आली आहेत. सफेद साडीच त्यांना प्रिय आहे. सोमवार असेल तर साडीची किनार एका रंगाची, शुक्रवार – शनिवारी वेगळ्या रंगाची असते. अमावस्येच्या दिवशी त्या गात नाहीत अथवा प्रवासाला किंवा नव्या योजनेला सुरुवात करीत नाहीत. आठवड्यातून एकदा महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचा त्यांचा नेम आहे. व्रतवैकल्य, उपासतापास याबाबत त्या आग्रही आहेत. जगाच्या कोठल्याही कानाकोपर्‍यात असल्या तरी तो दिवस कडक उपासाचा असेल तर उपवासाचं कडक पालन आणि कार्यक्रम दोन्ही त्या व्रतस्थपणे निभावतात. ‘‘माझा मागील जन्मावर व पुनर्जन्मावर पूर्ण विश्‍वास आहे. लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात ही पूर्वजन्मीचीच पुण्याई असणार.’’ दीदी सश्रद्ध आहेत ते या अर्थाने. ज्ञानेश्‍वर, शिवकल्याण राजा, मीरा, तुकाराम यांचे अल्बम्‌स करताना त्या सात्विक आहारच घेत असत. दररोज पहाटे सूर्याच्या उपासनेने सुरू होणारी दीदींची पूजा तासभर चालू असते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी स्टुडिओत त्यांना उद्बत्त्यांचा सुगंध हवा असतो.

कुटुंबवत्सल तरीही एकांतप्रिय

‘प्रभुकुंज’मधील दीदींच्या खोलीत पलंगाजवळच्या टेबलावर दोन टेलिफोन आहेत. (यातील एका खासगी फोनचा नंबर तुम्हाला ठाऊक असणं हे तुम्ही तिच्या अगदी विश्वासातील आहात याचं प्रतीक) सरकारच्या सुरक्षेच्या नियमामुळे हा टेलिफोन नंबर दर तीन महिन्यात बदलला जातो. त्या उत्तम हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांच्या पलंगाच्या मागे काही फोटो लावलेले आहेत. त्यांच्या छायाचित्रांचा आवडीचा विषय म्हणजे- लोक व त्यांचे चेहरे! त्यांना अधूनमधून स्वयंपाक करायची हुक्की येते. प्रत्येकाच्या वाढदिवसाला आठवणीने रात्री बाराच्या ठोक्याला त्याच्या – तिच्या खजिन्यात एका भेटीची भर पडते. दिलेल्या व स्वीकारलेल्या भेटींची नोंद त्यांच्या संगणकासारख्या मेंदूतील एखाद्या सब-डिरेक्टरीत कायमची नोंदली जात असते.

आजन्म विद्यार्थिनी

प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार दीदींच्या उमेदवारीच्या काळात उद्गारले होते- तिच्या उर्दू उच्चारात डाळभाताचा गंध आहे. त्यामुळे विरस होतो. त्या क्षणी तिने हिंदी- उर्दू भाषा शिकण्यासाठी कंबर कसली. उत्तम गुरुजनांकडून भाषांचा लहेजा – खुशबू आत्मसात केला. बाबांव्यतिरिक्त उस्ताद अमान अली भेंडीबाजारचे इंदोर घराण्याचे उस्ताद अमानत अली खॉं यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकल्या. उस्ताद बडे गुलाम अली खॉं, उस्ताद अमीर खॉं यांच्याकडून प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यिक गो. नी. दांडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, वि. स. खांडेकर, प्रा. राम शेवाळकर, कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट, कवी शंकर वैद्य यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. कवी नरेंद्र शर्मा त्यांना पितृतुल्य. ती त्यांना पापा म्हणायची.

रॉयल्टीच्या प्रश्नावर लतादीदी आणि राजकपूर यांचं बिनसलं. तलत महमूद आणि दीदी यांच्यात एकदा गैरसमजाची भिंत उभी राहिली. दोघांनाही एकमेकांविषयी परमादर. त्यामुळे दुरावा संपला. ओमकार प्रसाद अय्यर हे दीदींचे आवडते संगीतकार. वेळेचे आणि शिस्तीचे भोक्ते. एका ध्वनिमुद्रणासाठी दीदींच्या कार्यबाहुल्यामुळे नय्यरसाहेबांची वेळ त्यांना पाळता आली नाही. त्या दिवसरात्र तीन-तीन शिफ्ट्‌समध्ये ध्वनिमुद्रणात व्यग्र असायच्या त्यावेळचा हा प्रसंग. नय्यरसाहेबांनी तू नही और सही असा पवित्रा घेतला. मात्र दोघांमध्ये कटूता निर्माण झाली नाही. आगलाव्या मंडळींनी दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याची संधी दवडली नाही. नय्यर साहेबांच्या एका मुलाखतींत दीदींबद्दल गौरवोद्गार आहेत- ‘‘मदन मोहन लता मंगेशकरसाठी जन्मले की लता मंगेशकर मदनमोहन यांच्यासाठी हे मला ठाऊक नाही. परंतु आजपर्यंत मदनमोहनसारखा संगीत दिग्दर्शक झाला नाही व लता मंगेशकरसारखी गायिका झाली नाही.’’
सर्जनशील संगीतकार एस्. डी. बर्मन आणि दीदींमध्ये असेच गैरसमजाचे धुकें पसरले होते. ते टिकणारे नव्हतेच. ‘‘लोता- तुमबिन जाऊं कहॉं’’ हा राग आळवून बर्मनदांनी दीदींची समजूत काढली. सलील चौधरींचे दीदींशिवाय पान हलायचे नाही. दोघांनीही एकमेकांची प्रतिभा ओळखली होती. सलीलदा माझेही आवडते संगीतकार. सलील हे माझ्या मोठ्या मुलाचे नाव हे याच आदरापोटी मी ठेवले.

छंद आणि आवडीनिवडी

दीदी उत्तम नकलाकार आहेत. उंची अत्तरं, पांढर्‍या रंगाच्या उत्तमोत्तम साड्या, कानात हिर्‍याच्या कुड्या, पायात सोन्याची पैंजणं आणि हातात हिर्‍याच्या बांगड्या. आवडत्या व्यक्तींना साड्या देण्याची त्यांची हौस अपरंपार. हेमा मालिनीना अशा साड्या देताना अजून त्यांची हौस फिटलेली नाही. उत्तम छायाचित्रकार तशाच त्या उत्तम नेमबाज आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. एअरगन त्या सफाईने चालवतात. अगदी आरशात बघूनही त्या लक्ष्यवेध साधायला चुकत नाहीत. ‘पडोसन’ हा त्यांचा आवडता चित्रपट. किती वेळा तो पाहिला आहे याची गणती नाही. गुरुवार असेल तर ‘शिर्डी के साईबाबा’ हा चित्रपट पाहणार. कोणताही कार्यक्रम वेळेवर सुरू व्हावा याबाबतीत त्या आग्रही असतात. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला नाही तर तो यशस्वी होत नाही अशी त्यांची धारणा. शिकागो शहरात सायंकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाची वेळ ठरली होती. त्याच दिवशी त्याच रंगमंचावर जगप्रसिद्ध नट रिचर्ड बर्टन यांची भूमिका असलेलं ‘कॅमेलॉट’ नाटक होणार होतं. दीदी आणि त्यांचा संच थिएटरवर वेळेवर पोचला तरी रंगमंच अजून खाली झालेला नव्हता. नाटकाचा सेट हलवला जात होता. तोवर बॅकस्टेजवर जाऊन आम्ही बसू शकतो का? अशी विचारणा केल्यावर तिथे रिचर्ड बर्टन आराम करीत आहेत असं उत्तर देण्यात आलं. हे उत्तर ऐकून दीदींचा पारा चढला. ‘‘जर पंधरा मिनिटात रंगमंच खाली करून मिळाला नाही तर आम्ही कार्यक्रम रद्द करून दावा दाखल करू. पैसा व आमच्या प्रतिष्ठेची हानी याची नुकसानभरपाई म्हणून तुम्हाला लाखो डॉलर्स द्यावे लागतील.’’ पाच – दहा मिनिटातच त्यानंतर अमेरिकेचे नाटक व चित्रपटातील सर्वश्रेष्ठ अभिनेते रिचर्ड बर्टन हे तेथून पाय आपटीत चालते झाले. आत्मसन्मान, अधिकार आणि कर्तव्य याबाबत तडजोड संभवत नाही हे दीदींकडून शिकावं.

मंगेशकर भावंडांची एकजूट अभेद्य आहे. ९१व्या वर्षाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना दीदींनी आजतागायत या कुटुंबाचं कर्तेपण निभावलं आहे. मंगेशकर भावंडांच्या या वात्सल्यभावनेला शब्दरूप दिलंय त्यांच्या लाडक्या भाऊरायाने. त्यांचे शब्द आहेत- ‘‘दीदीच्या गळ्यातून बाबा गात असतात.’’ आणि दीदीच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी हा श्रवणानुभव नव्हे तर अमृतानुभव असतो.