ब्रेकिंग न्यूज़
अवकाश संशोधनात भारत आशियात अव्वल
दाबोळी विमानतळावर उपराष्ट्रपती व्यंकय्य नायडू यांचे स्वागत करताना राज्यपाल मृदुला सिन्हा व मान्यवर.

अवकाश संशोधनात भारत आशियात अव्वल

——————————————
बांबोळीतील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे प्रतिपादन
——————————————
पणजी (न. प्र.)
भारत हा अवकाश संशोधनात आशियातील आघाडीचा देश आहे. आपली मंगळ मोहिम फत्ते करणार्‍या भारताने अवकाश संशोधनात आशियातील अन्य राष्ट्रांना मागे टाकले आहे, असे भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यानी काल सांगितले. भारत आपल्या अवकाश मोहिमेचा केवळ शांततेसाठी वापर करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
काल बांबोळी येथील एका पंचातारांकित हॉटेलात सागर ह्या राष्ट्रीय सुरक्षाविषयाक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. ‘स्पेस पार्टनरशीप’ हा या परिषदेचा विषय असून ही परिषद २५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
अवकाश मोहीम ही जशी सुरक्षेच्या नजरेने महत्वाची आहे तशीच ती संशोधनाच्या दृष्टीनेही महत्वाची असल्याचे नायडू यानी स्पष्ट केले. अवकाश संशोधन व अवकाश तंत्रज्ञान यामुळे नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल अशा संकटांवर मात करता येणार असल्याचे नायडू म्हणाले.
अवकाश मोहीमेमुळे भविष्यकालीन आव्हाने काय असतील व त्यांचा सामना कसा करता येईल हे कळू शकणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
अवकाश मोहिमांसाठी परस्पर सहकार्याची गरज असून भारताने अन्य राष्ट्रांकडून सहकार्य घेतले आहे व भविष्यात अन्य राष्ट्रांना भआरत सहकार्यही करणार असल्याचे ते म्हणाले.
भारत शांतीचा संदेश देणारा देश
भारत हा शांतीचा संदेश देणारा देश असून भारताने कधी कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही. मात्र, ज्या देशानी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला भारताने चोख उत्तर दिलेले आहे, असे ते म्हणाले.
देशातील २० टक्के जनता ही अजून गरीब रेषेखाली असल्याचे सांगून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पावले उचलावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
प्रगतीसाठी देशाला ज्ञानधारी बनावे लागेल
प्रगती साधायची असेल तर भारताला ज्ञानधारी देश बनावा लागेल. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची गरज असल्याचे त्यानी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क सॅटलाईट’ ही संकल्पना पुढे आणली असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या सागर परिषदेत एकूण २२ राष्ट्रांनी भाग घेतला होता, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गोव्यात सागर परिषद व्हावी यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी पुढाकार घेतला होता अशी माहिती यावेळी बोलताना लेफ्टनंर जनरल डॉ. डी. बी. शेकतकर यानी दिली.
भविष्यकाळात भारताला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल यावर ह्या परिषदेत चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. पुढील काळात ज्या राष्ट्रांचे सागर व अवकाश यावर सत्ता असेल ती राष्ट्रे बलवान राष्ट्रे बनू शकणार असल्याचे शेकतकर यानी यावेळी स्पष्ट केले. अवकाश हा आता वेगळा व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा प्रदेश बनला असल्याचे शेकतकर यानी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण जग आता भारताकडे मोठ्या आशेने पाहू लागले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
दळणवळणासह बरेचसे आधुनिक तंत्रज्ञान हे अवकाश संशोधनावर आधारित आहे. अवकाश संशोधनात झालेल्या प्रगतीमुळे मोबाईलत, तसेच अन्य डिझिटल माध्यमांचा उदय होऊ शकल्याचे ते म्हणाले.
सागर परिषदेचे निमंत्रक डॉ. प्रभाकरन् पालेरी हे यावेळी म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त लोकांची सुरक्षाच नव्हे तर एकूणच मानव जातीचे कल्याण आहे.
इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार व गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांचीही यावेळी भाषणे झाली. ह्या वेळी व्यासपीठावर मंत्री माविन गुदिन्हो हेही हजर होते.