अमेरिकेतील खदखदणारा असंतोष

  •  दत्ता भि. नाईक

हे सारे विश्‍व आमचा वंश आणि आमचा धर्म यांच्याच मालकीचा आहे असे समजणार्‍या श्‍वेतवर्णीय समाजाने या व अशा घटना पुढे घडता कामा नयेत याची काळजी घेतली आहे. अमेरिका नावाच्या राष्ट्राचे ऐक्य राजकीय करारावर अवलंबून आहे व नीट काळजी घेतली नाही तर देशाच्या विघटनेला फार वेळ लागणार नाही. खदखदणारा हा असंतोष अमेरिकेच्या मुळावरच आला नाही म्हणजे मिळवली.

२५ मे २०२० हा दिवस कोरोनाशी लढताना नामोहरम झालेल्या अमेरिकेला असंतोषाच्या कडेलोटापर्यंत नेणारा ठरला. या दिवशी अमेरिकेतील मिनियापोलीस या शहरात डेरेक चाउविन या पोलिस अधिकार्‍याने त्याच्या ताब्यातील इसम जॉर्ज फ्लॉयड याच्या मानेवर नऊ मिनिटे स्वतःचे गुडघे दाबून ठार मारले. सुरुवातीला हा ‘कस्टोडियल डेथ’चा प्रकार आहे असे वृत्त होते; परंतु डेरेक याने जॉर्ज फ्लायड याचे हात बेडीत अडकवून त्याला असहाय अवस्थेत भर रस्त्यावर खाली पाडून अतिशय क्रूर पद्धतीने त्याचे प्राण घेतले होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या कोणत्याही सहकार्‍याने त्याला तसे करण्यापासून रोखले नाही. त्याला पोलिसांनी पकडले याचा अर्थ त्याने कोणता ना कोणता अपराध केलेला असणार. अपराध्याला पकडणे हा पोलिसांचा शिरस्ता आहे. पुढील कारवाई न्यायालयाने करायची असते व आरोप सिद्ध होण्याकरिता आरोपी जिवंत असणे आवश्यक असते, ही लोकशाहीतील न्यायव्यवस्थेची सर्वमान्य प्रक्रिया आहे. कधीकधी पोलिसांचा मार वर्मी बसल्यामुळे आरोपी मरण पावतो. तो एक अपघात असतो. परंतु या ठिकाणी तसेही घडले नाही. जॉर्ज फ्लायड याचा गळा मरेपर्यंत दाबला गेल्याचे सिद्ध झाले आहे.

कृष्णवर्णीयांच्या मुलांना विकण्याचा धंदा
देशात बरीच वर्षे दाबून ठेवलेला असंतोष उफाळून येण्याचे कारण म्हणजे, मयत जॉर्ज फ्लायड हा कृष्णवर्णीय होता व त्याला अमानुषपणे ठार मारणारा पोलिस अधिकारी डेरेक चाउविन हा श्‍वेतवर्णीय होता. यांनीच कॅनडाच्या उत्तरेला असलेले बर्फाळ क्षेत्र ते अर्जेंटिनापर्यंत अख्ख्या खंडाला अमेरिका हे नाव दिले व तेथील मूळ निवासींना तुम्ही जनावरे आहात असे सांगून ठार मारले. याउलट भारतातील जनजाती क्षेत्रातील लोकांना तुम्ही जनावरे आहात, पण आता आम्ही तुम्हाला माणसात आणतो असे सांगून त्यांचे ख्रिस्तीकरण केले. आज अमेरिका या नावाने ओळखला जाणार्‍या युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका या देशाचा इतिहास तर वंशभेद व वर्णभेद याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. श्‍वेतवर्णीयांच्या अमेरिकेतील कॉफी, बटाट, टोमॅटो, तंबाखू यांसारखी नवीन बियाणी हाताला लागली. जमीन तर एकदम सुपीक. त्यामुळे कमरतोड मेहनत करून अन्न-वस्त्र-निवारा याचीच आवश्यकता असलेल्या गुलामांची गरज होती. आफ्रिका खंडातील दणकट शरीरयष्टीच्या कृष्णवर्णीयांची लहान मुले पळवून ती अमेरिकेतील श्‍वेतवर्णीयांना विकणे हा काही फुकटखाऊ श्‍वेतवर्णीय लोकांचा धंदा बनला होता. ४ जुलै १७७६ रोजी इंग्रज लोकांनी वसवलेल्या तेरा राज्यांनी इंग्लंडचे वर्चस्व झुगारून देणार्‍या स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळवून युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका या नूतन राष्ट्राची स्थापना केली. सध्या अमेरिकेच्या राज्यांची संख्या पन्नास आहे. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. त्यांच्या कार्यकाळात (सन १८६० ते १८६५) दक्षिणेतील राज्यांच्या गुलामांची पद्धत चालू ठेवण्यासाठीच्या आग्रहाला त्यांनी विरोध केला. या विषयावर देशाची फाळणी होणार होती. ती टाळण्यासाठी त्यांनी सिव्हिल वॉर सुरू केले व त्यात ते विजयी झाले. त्यावेळी फाळणी की युद्ध यापैकी युद्धाची निवड केली व यशस्वी झाले.

प्रथम महायुद्धात अमेरिकेचे महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात अधोरेखित झाले. द्वितीय महायुद्धाच्या अखेरीस सोव्हिएत संघराज्य व अमेरिका अशा दोन तुल्यबळ जागतिक शक्तींचा उदय झाला. संपूर्ण जग अमेरिका व सोव्हिएत अशा दोन गटांमध्ये वाटले गेले. १९९१ च्या डिसेंबरमध्ये सोव्हिएत संघराज्य स्वतःच्याच वजनाखाली कोसळले. याचा परिणाम म्हणून अमेरिका ही एकमेव जागतिक महाशक्ती म्हणून वावरू लागली.

कर्फ्यूला न जुमानता
मिनियापोलीस येथील घटनेची प्रतिक्रिया अमेरिकेतील बहुतेक सर्व प्रमुख शहरांत उमटली. कोरोनाचा प्रादुर्भाव होईल म्हणून एकमेकामध्ये ठराविक अंतर ठेवण्याची सूचना धुडकावून लावून लोकांनी मोर्चा, निदर्शने या मार्गाने निषेध नोंदवण्यास सुरुवात केलेली आहे. एक आठवडा लोटला तरी निषेधाचे कार्यक्रम थांबण्याचे नावही घेत नाही. निदर्शने नियंत्रणाखाली आणण्यासाठी सेनादलांना सतर्क राहण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे. काही शहरांमध्ये आंदोलन नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहे. आतापर्यंतच्या वांशिक हत्यांचा कहर गाठणारी ही घटना आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. लाखो लोक बेकार झालेले असताना आणि एक लाखाहून जास्त माणसे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली असताना ही घटना घडणे म्हणजे देशाचे दुर्दैव आहे असे त्यांना वाटते. ओल्गा हॉल यांनी वॉशिंग्टन येथे वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले की, पोलीस नियंत्रणाच्या बाहेर गेलेले आहेत व ते रानटी बनलेले आहेत.
मिनियापोलीसमध्ये कर्फ्यूला न जुमानता जनता रस्त्यावर आली असून पोलिसांच्या गाडीला आग लावणे, दुकाने फोडून तेथील टी.व्ही.सारख्या वस्तू लंपास करणे, अश्रुधूर व रबराच्या गोळ्यांचा वापर करणे चालूच आहे. फिलाडेल्फिया शहरात तेरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. न्यूयॉर्क शहरात रस्ता मोकळा करण्यासाठी काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा जमाव खूपच आक्रमक बनला. निदर्शकांच्या अंगावर वाहने घालून त्यांना पांगवण्याचाही प्रयत्न झाला.

अंगावर दुष्ट कुत्रे सोडू!
‘आय कान्ट ब्रीद’- मी श्‍वास घेऊ शकत नाही- ही आंदोलनकर्त्यांची घोषणा आहे. गुरुवारपर्यंत बावीस शहरांतून कमीत कमी १६६९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मिनियापोलीस शहरातील महानगरपालिकेवर डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे असल्यामुळे त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकलेली आहे. देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका तोंडावर आहेत व ट्रम्प दुसर्‍यांदा आपले भवितव्य अजमावणार आहेत. विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून देशात चाललेल्या हिंसाचाराचा निषेध केलेला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या डेरेक चाउविन याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली गेली तरीही हा उद्रेक थांबण्याचे नाव घेत नाही.

सडेतोड वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘आम्ही आंदोलकांवर दुष्ट कुत्र्यांना सोडू’ असे वक्तव्य केल्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले आहे. दुष्ट कुत्रे सोडणे हा वाक्प्रचार १९६० च्या दशकात वापरात आला होता. त्यावेळेसही असाच उद्रेक झाला असता अलाबाना राज्यातील जॉर्ज वॅलेस व बुल कॉनर यांनी असा शब्दप्रयोग केला होता- ‘व्हॅन लुटिंग स्टार्ट्‌स, शूटिंग स्टार्ट्‌स’ म्हणजे तुम्ही लुटणे सुरू कराल तर गोळीबारही सुरू होईल असे ते म्हणाले तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून टेलर स्वीफ्ट यांनी आम्ही नोव्हेंबरमध्ये तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून घरी पाठवू असे म्हटले आहे. १९६८ मध्ये कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी अहिंसक मार्गाने लढणार्‍या नेत्याची श्‍वेतवर्णीय माथेफिरूने हत्या केली होती, ही घटना अजूनही विस्मरणात गेलेली नाही.

अलीकडे २०१४ साली एरिक गार्नर या कृष्णवर्णीयाची हत्या करणार्‍यांना पोलिसांनी संरक्षण पुरवले व कारवाई होऊ दिली नाही. अहमद आब्रेम या ज्यॉर्जिया राज्यातील कृष्णवर्णीयांच्या हत्येचा प्रकारही असाच आहे. तीन श्‍वेतवर्णीयांनी हा गुन्हा केला व वरून मरण पावलेला माणूस कृष्णवर्णीय आहे म्हणून आम्हाला गुन्हा माफ करावा अशी मानवतेला मान खाली घालण्यास लावणारी मागणी केली.

कृष्णवर्णीय इस्लाम स्वीकारतात
अन्तिफा नावाच्या संघटनेने या आंदोलनाचे संचालन केलेले आहे. या संघटनेचा इतिहास फारसा चांगला नाही. ही दहशतवादी डाव्या विचारांची संघटना आहे. अन्तिफा स्वतःला फॅसिस्टविरोधी म्हणवून घेते. कोणत्याही लोकशाही मार्गाने जाण्याचे सोडून शस्त्रबळावर सत्ता ताब्यात घेणे हे या संघटनेचे ध्येय आहे. घडलेल्या घटनेचा फायदा घेऊन ही संघटना देशभर हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे हे आंदोलन नियोजनबद्ध पद्धतीने अराजकवाद्यांकडून चालवले जात आहे. शासनाने ऍटर्नी जनरल विलियम बार यांना दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आम्ही अन्तिफा व इतर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रांतर्गत दहशतवादी गटांच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहोत आंदोलकांनी सेंट जॉन्स चर्चला आग लावली यावरून आंदोलन कोणत्या थराला पोहोचले आहे हे लक्षात येते. स्वामी विवेकानंदानी सुमारे सव्वाशे वर्षांमागे म्हटले होते की, श्‍वेतवर्णीय व कृष्णवर्णीयांना चर्चमध्ये एकत्र प्रार्थना म्हणताना मी बघितलेले नाही. आजही परिस्थितीत फार सुधारणा झालेल्या आहेत असे नाही. याची प्रतिक्रिया म्हणून बरेच कृष्णवर्णीय इस्लामचा स्वीकार करतात. कॅशियस क्लेचा अहमद अली झाला तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही धर्मांतराची प्रक्रिया भविष्यकाळात अमेरिकेसमोर फार मोठी समस्या उभी करणार आहे. हे सारे विश्‍व आमचा वंश आणि आमचा धर्म यांच्याच मालकीचा आहे असे समजणार्‍या श्‍वेतवर्णीय समाजाने या व अशा घटना पुढे घडता कामा नयेत याची काळजी घेतली आहे. अमेरिका नावाच्या राष्ट्राचे ऐक्य राजकीय करारावर अवलंबून आहे व नीट काळजी घेतली नाही तर देशाच्या विघटनेला फार वेळ लागणार नाही. खदखदणारा हा असंतोष अमेरिकेच्या मुळावरच आला नाही म्हणजे मिळवली.