अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याच्या सूचना

अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याच्या सूचना

>> पाकस्थित दहशतवाद्यांचा यात्रेकरूंवर हल्ल्याचा कट ः लष्कराची माहिती

अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटक यांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना जम्मू काश्मीर सरकारने केली आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याच्या माहितीवरून जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरू व पर्यटकांना माघारी परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीरमधून बाहेर पडण्याची सूचना केली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने काल पत्रकार परिषदेत दावा केला की पाकस्थित दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. मात्र लष्कर असा कोणताही प्रयत्न उधळून लावण्यास सज्ज असल्याचे लष्करी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा १३ दिवस आधीच थांबविण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या वरील माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाच्या सचिवांनी वरील आदेशवजा सूचना जारी केली आहे.

काश्मीर खोर्‍यातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन पर्यटक व अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी त्यांना तातडीने काश्मीर सोडण्यास सांगण्यात आले असून परतताना योग्य काळजी घेण्याची सूचना केली आहे.

यात्रेबाबत सुरू होण्यावर
अधिकृत माहिती नाही
दरम्यान, अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याविषयी अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. पुढील आदेशापर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमरनाथ यात्रा १५ ऑगस्टपर्यंत चालणार होती.

सुरक्षा दलांची
संयुक्त मोहीम
सुरक्षा दलांनी एका संयुक्त मोहीमेत गेल्या काही दिवसांपासून संभाव्य हल्ल्यांची माहिती मिळवली असल्याचे ढिल्लॉं म्हणाले. बालताल व पहलगाम या भागात ही शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी भुसुरूंग, रायफली व शस्त्रसाठा सापडला.

माध्यमांची सुरक्षा दल
तैनातीची माहिती अतिरंजित
दरम्यान, पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी प्रचंड संख्येने राज्यात सुरक्षा दलांचे जवान तैनात केल्याची माध्यमांची माहिती अतिरंजित असल्याचा दावा केला. काही दलांना तैनात केले आहे तर काहींना बदली म्हणून आणले गेले आहे असे ते म्हणाले.

यात्रेच्या मार्गावर सापडले
भूसुरुंग, स्नायपर रायफल्स
दरम्यान, भारतीय लष्कराच्या एका पत्रकार परिषदेत अधिकार्‍यांनी सांगितले की, पाक लष्कराचे पाठबळ असलेले दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे कारस्थान रचत असल्याची विश्‍वसनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरूंग आणि स्नायपर रायफल्स सापडल्याची माहिती पत्रकार परिषदेत लेफ्ट. जनरल के. जे. एस. ढिल्लॉं यांनी दिली. गेल्या चार दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी संभाव्य दहशतवादी कारवायांबाबत माहिती दिल्याचे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग हेही यावेळी उपस्थित होते. वरील भुसुरुंग पाकमधील फॅक्टरीत तयार केल्याचे व रायफली एम-२४ या अमेरिकी बनावटीच्या असल्याची माहिती ढिल्लॉं यांनी दिली. पाकिस्तान काश्मीरमधील शांततेला बाधा आणू पाहत असून मात्र हे आम्ही घडू देणार नाही असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरात आणखी
२८ हजार जवान तैनात

जम्मू-काश्मीरमधील होणारी घुसखोरी रोखणे व कायदा आणि सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी आधी या राज्यात दहा हजार केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान पाठविण्याचे आदेश केंद्राने दिल्यानंतर आता आणखी २८ हजार (२८० कंपन्या) जवान पाठविण्याचे आदेश देऊन त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षा दलांच्या या प्रचंड संख्येतील आकस्मिक तैनाती विषयी कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही.
हे जवान बहुतेक केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असून त्यापैकी श्रीनगरमधील अनेक संवेदनशील भागांसह काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना तैनात केले जात आहे.

श्रीनगरमधील प्रमुख प्रवेश नाके व बाहेर पडण्याच्या नाक्यांवर केंद्रीय निमलष्करी व स्थानिक पोलिसांना मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, दुर्गम भागातील धार्मिक स्थळांवर विदेशी दहशतवादी हल्ले करण्याच्या शक्यतेच्या माहितीमुळे तेथील सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांच्या पुढील सुट्‌ट्या आताच देऊन या संस्था गुरुवार पासूनच १० दिवसांसाठी बंद ठेवल्या आहेत. स्थानिक लोकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण असून कायदा सुव्यस्था प्रश्‍नाच्या भीतीमुळे लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सुरू केली आहे.