ब्रेकिंग न्यूज़

अपात्रताप्रकरणी आजगावकर, पाऊसकरांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना आगामी पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यास प्रतिबंध आणि मतदानाचा हक्क देऊ नये यासाठी दाखल केलेल्या जोड याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोघांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. तर, त्यांच्याविरोधातील आमदार अपात्रता प्रकरणी मुख्य याचिकेवर उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत काल दिली.
सभापतींसमोर मगोपचे आमदार ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्री आजगावकर आणि बांधकाम मंत्री पाऊसकर यांच्याविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केली आहे. तसेच, सभापतींसमोर दोघांना आगामी पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जोड याचिका सादर केली आहे.

गेल्या मार्च महिन्यात मगोपचे आमदार तथा मंत्री आजगावकर आणि आमदार दीपक पाऊसकर यांनी मगोप विधिमंडळ वेगळा गट तयार करून आपल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण केले आहे. त्यामुळे मगोपचे आमदार ढवळीकर यांनी मंत्री आजगावकर आणि पाऊसकर यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. तसेच, सभापतीसमोर अपात्रता याचिका प्रलंबित असल्याने दोघांना आगामी पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यास प्रतिबंध करावा आणि मतदानाचा हक्क देऊ नये, अशी मागणी करणारी जोड याचिका सादर केली आहे.
सभापती पाटणेकर यांच्यासमोर या दोन्ही याचिकांवर पहिली सुनावणी सोमवारी घेण्यात आली.