अपाची हेलिकॉप्टर ठरतील गेमचेंजर!

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अलीकडेच भारतीय वायुसेनेत आठ अपाची हेलिकॉप्टरे दाखल झाली. सामरिक परिभाषेत ह्या हेलिकॉप्टरला शत्रूच्या तडाखेबंद मार्‍याला झेलत त्याच्यावर फार मोठा आघात करणारी फ्लाईंग मशीन म्हणतात. अपाची हे भारताचे पहिल प्युअर अटॅक हेलिकॉप्टर आहे. दहशतवाद्यांनी आपले बस्तान मांडले असेल तेथे अपाची अटॅक हेलिकॉप्टर्सचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. चिनुक आणि अपाची ही दोन्ही हेलिकॉप्टर्स भारतासाठी गेम चेंजरचे काम करतील.

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सामरिक शक्ती संवर्धनासाठी बोईंग व लॉकहिड मार्टिन या अमेरिकन कंपनीकडे मागणी केलेल्या २२ पैकी आठ अपाची एएच ६४ ई हेलिकॉप्टरांना भारतीय वायुसेनेत सामील करण्यात आले. वायुसेनेच्या जुन्या एमआय ३५ या रशियन हेलिकॉप्टरांच्या जागी आलेली ही जगातली सर्वोत्तम ऍव्हान्स्ड मल्टी रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहेत. अतिचपळ व स्वसंरक्षणसिद्ध असणारी ही हेलिकॉप्टर सर्व प्रकारचा भूभाग, हवामान आणि चकमकींमध्ये आपल्या रात्रंदिन कार्यरत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नावाजली जातात. यात एक वैमानिक व एक गनर असतात. वायु सेनाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, ती वायुसेनेच्या पठाणकोट स्थित १२५ हेलिकॉप्टर युनिटमध्ये दाखल झाली आहेत. अँटी आर्मर हेलफायर क्षेपणास्त्र बाळगणारी ही हेलिकॉप्टरे अगदी कमी उंचीवर वेगाने उड्डाण भरत शत्रू रडारांपासून आपला बचाव करत पंजाब आणि राजस्थान क्षेत्रात तैनात पाकिस्तानी रणगाडे व कॉंक्रीट बंकर्स उद्ध्वस्त करू शकतात.

या हेलिकॉप्टरचे कॉकपिट आणि बॉडीमध्ये ‘रिइन्फोर्स्ड आर्मर’ आणि ‘बुलेटप्रूफ ग्लास’ लावलेला असतो. त्यामुळे हे अनुक्रमे १२.७ आणि २३ मिमी बुलेट्सचा मारा सहज झेलू शकतात. डेटा नेटवर्किंगच्या सहाय्याने ही हेलिकॉप्टर्स युद्धक्षेत्रातील फोटो ट्रान्समीट आणि रिसिव्ह करण्यासही सक्षम असतात. भारतीय वैमानिक गेल्या वर्षीपासून अमेरिकेत ह्या हेलिकॉप्टर उड्डाणांचे प्रशिक्षण घेताहेत. असे म्हणतात की १००० तासांचा हेलिकॉप्टर उड्डाणाचा अनुभव असणार्‍या भारतीय वैमानिकांनाना अपाची हेलिकॉप्टर्सवर वैमानिक म्हणून तैनात करण्यात आले आहे. मोठा दाब व उचल, संयुक्त संगणकीय कार्यप्रणाली, सुधारित स्वरक्षण, आकलनीय निर्णयक्षमता आणि स्वयंनिदान कौशल्यांमुळे या हेलिकॉप्टरांना टेहळणी, सुरक्षा, शांततेसाठी कारवाई आणि अचूक मारक क्षमतेसाठी उपयोगात आणली जातात. यांची उड्डाणक्षमता, तीन तासांची आहे. सामरिक परिभाषेत ह्या हेलिकॉप्टरला शत्रूच्या तडाखेबंद मार्‍याला झेलत त्याच्यावर फार मोठा आघात करणारी फ्लाईंग मशीन म्हणतात.

अपाची हेलिकॉप्टर एका वेळी १६ हेलफायर मिसाईल्स नेऊ शकते आणि त्याचे इन बिल्ट रडार एका मिनिटात १२८ लक्ष्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांचे वर्गीकरण करू शकते. याची चेन गन स्थिर राहू शकणार्‍या गनरच्या जागेखाली नाईट व्हिजन डिव्हाईस कॅमेर्‍यासोबत बसवलेली असते. नाईट व्हिजन कॅमेरा आणि चेन गनचा समन्वय, गनरच्या डोक्यावरील कॅमेर्‍याच्या दृष्टीशी साधलेला असल्यामुळे गनर जिकडे पाहतो तिकडेच गन फायर करते. या शिवाय गनर जिकडे पाहील तिकडेच त्याची क्षेपणास्त्रेही फायर होतात. हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी मुख्य वैमानिक आणि गन-मिसाईल-रॉकेट फायर करण्यासाठी गनर जबाबदार असतो.

जानेवारी,१९९१ मध्ये जर्मनीतील ११ व्या अमेरिकन एव्हिएशन ब्रिगेडच्या १४७ अपाची हेलिकॉप्टरांना कुवैतमधील इराकी आक्रमणाला परतवून लावण्यासाठी तैनात केले गेले होते. त्यावेळी त्यांनी शत्रूच्या २४५ आर्मर्ड व्हेइकल्सना उद्ध्वस्त केले. ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्ममध्ये या हेलिकॉप्टर्सनी एकूण २७८ इराकी रणगाड्यांना उद्ध्वस्त केले होते.

२०१८ च्या शेवटाला भारतीय वायुसेनेत ट्वीन रोटर, हेवी लिफ्ट, चिनूक ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर दाखल झाले. या हेलिकॉप्टरमधून हेवी मशीनरी, आर्टिलरी गन्स, हलके रणगाडे, आर्मड पर्सनल कॅरियर्स, १५० सशस्त्र सैनिकांची वाहतूक करता येते. एका वेळी हे हेलिकॉप्टर ९.६ टनांचे वजन नेऊ शकते. अपाची प्रमाणेच हे देखील सर्व प्रकारचा भूभाग व हवामानात कार्यरत असते. पर्वतराजींमधील दर्‍यांमध्ये हे हेलिकॉप्टर लीलया मॅन्युव्हर करू शकते. सेनेची जड वहन क्षमता कायम राखण्यासाठी हे अतिशय उपयुक्त वाहन आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेत असलेल्या एमआय २६ हेलिकॉप्टर्सची जागा घेईल. भारताने अमेरिकेकडे १५ चिनूक हेलिकॉप्टर्सची मागणी केली आहे. त्यापैकी सहा चिनूक हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली आहेत. चिनूक आणि अपाचीचा सौदा २५०० दशलक्ष डॉलर्सचा आहे. या आधी भारताकडे जड वहनासाठी एमआय ३५ हे रशियन असॉल्ट हेलिकॉप्टर होते. त्यात सैनिकांची वाहतूक केली जायची. आता अपाची अटॅक हेलिकॉप्टर आणि चिनूक ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर असे दोन वेगळे स्पेशलाईझ्ड हेलिकॉप्टर्स वायुसेनेला मिळाल्यामुळे स्थलसेनेला कुठलीही मोहीम करणे सुलभ होईल.

अपाची आणि चिनूक हेलिकॉप्टर्स कोण वापरणार याबद्दल स्थल सेना आणि वायु सेना यांच्यात वाद सुरु आहेत. अपाची हेलिकॉप्टर स्थल सेनेच्या क्लोज एयर सपोर्टसाठी आवश्यक आहेत. ही हेलिकॉप्टर्स वापरण्यासाठी प्रत्येक वेळी वायुसेनेला विंनती करावी लागणार असेल तर आम्हाला आर्मी ऍव्हिएशन कोअरसाठी ३९ अपाची हेलिकॉप्टर्स देण्यात यावी ही स्थलसेनेची मागणी आहे. अपाची हेलिकॉप्टर जहाजांच्या डेकवरही उतरू शकत असल्यामुळे भारतीय नौदलाने देखील १६ अपाचीची मागणी सरकारकडे केली आहे. अर्थात ही पूर्ण करायची की नाही हे सरकार व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल. अपाची हे भारताचे पहिले प्युअर अटॅक हेलिकॉप्टर आहे. स्थल सेनेला त्यांच्या टेरोरिस्ट हाईड आउट अटॅक्ससाठी अपाची हेलिकॉप्टर्स अतिशय उपयुक्त आहेत. दहशतवाद्यांनी अशा ठिकाणी आपले बस्तान मांडले असेल जेथे पोहोचणे स्थलसेनेसाठी मोठी जीवहानी झेलल्याशिवाय शक्य होणार नाही तेथे अपाची हेलिकॉप्टर्सचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो.

अपाची व चिनूक हेलिकॉप्टर्सच्या जोडीला भारतीय वायुसेनेमध्ये ३६ हजार कोटी डॉलर्सची, ३६ राफेल फिप्थ जनरेशन फायटर्सही येत आहेत. आवाजाच्या अडीच पट वेगानी उड्डाण करणारी राफेल ही डीप पेनिट्रेशन, मल्टिरोल फायटर्स असल्यामुळे ती क्लोझ सपोर्ट, इंटरडिक्शन, डॉग फाईट, स्ट्रॅफिन्ग, बॉम्बिंग आणि आण्विक शस्त्रे नेण्याच्या कामी येतील. भारतीय इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपची मोहीम सुरू असताना पाकिस्तानच्या आत जाऊन त्यांची संसाधने उद्ध्वस्त करणारी आणि आयबीजीवर हल्ला करण्यासाठी येणार्‍या शत्रू विमानांना स्ट्राईकच्या अधिक आकाशातून पळवून लावणारी राफेल्स भारतीय वायुसेनेच्या मुकुटातील मोरपीस आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. २२ अपाची, १५ चिनूक हेलिकॉप्टर्स आणि ३६ राफेल लढाऊ विमान आल्यावर भारतीय वायुसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झालेली असेल आणि त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा स्थलसेना-नौसेनेलाही होईल.

२०२२ पर्यंत ही सर्व विमाने व हेलिकॉप्टर्स भारतीय संरक्षण दलात पूर्ण क्षमतेने सामील होतील. आक्रमण करणार्‍या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपच्या डोक्यावर १५-२० हजार फुटांवरून बॅटल इंटेलिजन्स देणारी ड्रोन्स, आयबीजींच्या रक्षणार्थ ३-५ हजार फुटांवर उड्डाण करत असलेली अपाची हेलिकॉप्टर्स, शत्रूच्या मागे जाऊन स्पेशल फोर्सेसना ड्रॉप करायला निघालेले चिनुक हेलिकॉप्टर आणि या सर्वांवर नजर ठेवणारा जी ७ उपग्रह या ताफ्याचा सक्रिय हिस्सा असणे हे स्पेशल फोर्समधील सैनिकाचे स्वप्न असते आणि आता लवकरच ते पूर्ण होईल.