ब्रेकिंग न्यूज़
अन्न भेसळ तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा

अन्न भेसळ तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा

पणजी (न. प्र.)
गोव्यातील लोकांच्या अन्नात भेसळ होते आहे की काय यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात एक जागतिक दर्जाची प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असून भारताच्या ‘एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी’कडे या प्रयोगशाळेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी काल कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत पर्वरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
अन्नात भेसळ होत असलेल्या ज्या तक्रारी येतील त्या या नव्या जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऑनलाईन तक्रारी पाठवण्यासाठीचीही सोय करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
परराज्यातून येणारी मासळी खराब होऊ नये यासाठी या मासळीला घातक फॉर्मेलीन लावले जात असल्याचे आढळून आल्यानंतर लोकांनी या मासळीची आयात बंद केली जावी अशी मागणी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मासळी आयात बंद न करण्याचा निर्णय घेत सरकारने मासळीसह सर्व अन्नाची तपासणी करण्यासाठी आता जागतिक दर्जाची प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या आझिलोत
नवी प्रयोगशाळा
ही प्रयोगशाळा जुन्या आझिलो इस्पितळ इमारतीत उभारण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.
अन्नातील भेसळ तपासण्याची जबाबदारी ज्या एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सीकडे सोपवण्यात आलेली आहे ती भारतातील सर्वात मोठी एजन्सी असून भारतातून विदेशात निर्यात केल्या जाणार्‍या सर्व अन्नाची व खाद्य पदार्थांची हीच एजन्सी तपासणी करीत असते व या एजन्सीला जागतिक मान्यता असल्याचे सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले. तपासणीसाठी मोबाईल व्हॅनचीही सोय करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी प्रत्यक्ष मासळीचा उल्लेख न करता आयात बंद करणे हा पर्याय ठरू शकत नसल्याचे सांगितले.
वरील प्रयोगशाळा थाटण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जुनी आझिलो इस्पितळाची इमारत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई उपस्थित होत्या.