ब्रेकिंग न्यूज़

अन्ननलिकेचा कर्करोग भाग – १

–  डॉ. स्वाती अणवेकर

अन्नलिकेचा कर्करोग हा एक सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा कर्करोग असून तो तेवढाच घातकही आहे. कारण हा कर्करोग आपल्याला झाला आहे हे जेव्हा रुग्णाला समजते तोपर्यंत रोगाचा प्रसार बराच वाढलेला असतो.

भारतामध्ये अन्ननलिकेचा कर्करोग हे कर्करोगाने होणार्‍या मृत्यूंचे चौथ्या प्रमांकाचे कारण आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाचे २ प्रकार आढळतात, जे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. त्यातील ८०% प्रकार हे ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’चे असतात. हल्ली बदलत चाललेली जीवनशैली व आहार यामुळे ऍडिनोकार्सिनोमा या प्रकारातसुद्धा वाढ झालेली आढळते. भारतामध्ये या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये दर एक लाखामागे ६.५ एवढे आहे तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण ४.२ एवढे आहे. आपल्या देशात दर वर्षी ४७००० नवीन अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात व त्यातील ४२००० रुग्ण दगावतात.

अन्नलिकेचा कर्करोग हा एक सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा कर्करोग असून तो तेवढाच घातकही आहे. कारण हा कर्करोग आपल्याला झाला आहे हे जेव्हा रुग्णाला समजते तोपर्यंत रोगाचा प्रसार बराच वाढलेला असतो. या कर्करोगाची सुरवात ही अन्ननलिका भिंतीच्या आतील स्तरापासून होते आणि मग तो बाहेर पसरतो. जर हा कर्करोग अन्ननलिकेच्या भिंतीच्या बाहेर पसरायला सुरवात झाली तर मात्र त्याचा प्रसार त्या भागातील लसिका ग्रंथी, छातीच्या भागातील रक्तवाहिन्या व अवयवांपर्यंत पसरू शकतो व पुढे त्याचा प्रसार फुफ्फुस, यतृत, आमाशय व अन्य भागात होण्याचा धोका अधिक असतो.

अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रकार ः
१) स्क्वॅमस सेल कार्सिनोमा – हा प्रकार सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. याची सुरुवात अन्ननलिकेमधील स्न्ॅमस पेशीपासून होते. या प्रामुख्याने अन्ननलिकेच्या वरच्या व मधल्या भागात सुरू होतोे. हा कर्करोग उत्पन्न करणारे घटक कोणते ते पाहू या….
१) अति मद्यपान
२) अति धूम्रपान
३) खारवून तयार केलेले पदार्थ जसे भाजी व फळांच्या लोणच्यावरील बुरशी.
४) अन्ननलिकेतील श्लेश्मल स्तर (म्युकोजल लेअर) जेव्हा जीर्ण अनन्नलिका अवरोधाने अथवा अति गरम पदार्थ जसे चहा, कॉफी यांचे सेवन केल्याने नष्ट झाल्यास.
५) रेडिएशन घेऊन अन्ननलिका आकुंचन पावल्यास.
२) ऍडिनोकार्सिनोमा – याची सुरुवात अन्ननलिकेतील ग्लँड्युलर टिश्यूपासून होते. हा प्रामुख्याने अन्ननलिकेच्या खालच्या भागात होतो- जिथे अन्ननलिका व आमाशय एकत्र येतात.
ऍडिनोकार्सिनोमाची कारणे आपण जाणून घेऊ यात….
१. विटामिन-ए, सेलेनियम, मॉलिब्डेनम, झिंक (जस्त) असे घटक शरीरात कमी असणे.
२. स्थौल्य, ३. क्रॉनिक गॅस्ट्रोइसोफॅजिअर रिफ्लक्स
४. धूम्रपान, ५. पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.
ज्यांना पूर्वी डोक्याचा अथवा मानेचा कर्करोग झाला असेल त्यांना अन्नलिकेचा स्क्वॅमस सेल कर्करोग होण्याचा धोका अधिक संभवतो.
वरील दोन्ही प्रकारच्या कर्करोगाची लक्षणे मात्र सारखीच असतात.
क्रमशः