अनुराग, नितिशचा सलग दुसरा विजय

>> २री गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

गँडमास्टर अनुराग म्हामल आणि फिडे मास्टर नितिश बेलुरकर यांनी आपली विजयी वाटचाल कायम राखताना २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत काल सलग दुसर्‍या विजयांची नोंद केली. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे.

अनुरागने आपल्या दुसर्‍या फेरीतील लढतीत फिडे मास्टर सुयोग वाघला पराभूत केले. फिडे मास्टर नितिश बेलुरकरने एमए कुरेशीवर मात केली. अन्य गोमंतकीय खेळाडूंत ऋत्विज परबने अनिल कुमार ओटीविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. निरज सारिपल्लीने अर्पण दासवर मात केली. दुसर्‍या फेरीअंती निरज १ तर ऋत्विज अर्ध्या गुणावर आहे. लीऑन मेंडोसा आणि नंदिनी सारिपल्ली यांना मात्र दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोघेही प्रत्येकी १ गुणावर आहे.
दरम्यान, पहिल्या पर्वाच्या विजेत्या ग्रँडमास्टर इदानी पोवयोने अव्वल मानांकित ग्रँडमास्टर इतुरिझागा बोनेल्लीला बरोबरीत रोखले. इदानीचे १.५ गुण झाले आहेत. फिडे मास्टर अनुज श्रीवास्तव (२३३६) आणि इतुरीझागा एदुआर्दो (२६३७) यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.

दरम्यान, ‘ब’ विभागात पाचव्या फेरीअंती गोव्याचा पार्थ साळवी चार गुणांसह ५०व्या स्थानी आहे. साईराज वेर्णेकर ३.५ गुणांसह ८८व्या स्थानी तर अनिरुद्ध पार्सकर व रुबेन कुलासो यांचेही ३.५ गुण झालेले आहेत. वुमन चेस मास्टर गुंजल चोपडेकर, आर्यन श्यामराव, इथान वाझ, साईश फोंडेकर, स्वयम नाईक व मंदार लाड हे प्रत्येकी ३ गुणांवर आहेत.