अनुबंध ः डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या लालित्यपूर्ण लेखनाचा आविष्कार

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘अनुबंध’ या ललितनिबंधसंग्रहात पडलेले आहे. त्यांतील काही लेख आत्मपर आहेत. गतकाळातील आणि नजीकच्या काळातील संस्मरणे त्यांत आहेत. साहित्यक्षेत्रातील मान्यवर लेखकांची व्यक्तिचित्रे त्यात आहेत. काही मृत्युलेखही त्यात समाविष्ट केलेले आहेत.

मराठीच्या नामवंत प्राध्यापक, प्रथितयश कथालेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी दीर्घकाळपासून सकस साहित्यनिर्मिती करून आपल्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांचे ‘कदंब’, ‘स्वच्छंद’, ‘तळ्यात…मळ्यात’ आणि ‘अनुबंध’ हे ललितनिबंधसंग्रह आहेत. अलीकडे त्या कादंबरी लेखनाकडे वळलेल्या आहेत. मराठी साहित्यजगत हा त्यांच्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. वाङ्‌मयीन संस्कृतीविषयी त्यांचे निस्सीम प्रेम. त्यांची साहित्यविषयक मर्मदृष्टी लक्षणीय स्वरूपाची.

डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘अनुबंध’ या ललितनिबंधसंग्रहात पडलेले आहे. या संग्रहात पंधरा लेख आहेत. त्यांचे स्वरूप संमिश्र आहे. त्यांतील काही लेख आत्मपर आहेत. गतकाळातील आणि नजीकच्या काळातील संस्मरणे त्यांत आहेत. साहित्यक्षेत्रातील मान्यवर लेखकांची व्यक्तिचित्रे त्यात आहेत. काही मृत्युलेख त्यात समाविष्ट केलेले आहेत.
‘असावे घर ते…’ हा आत्मपर लेख आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात वावरत असताना लेखिकेला घराविषयी तेवढीच ओढ वाटते. घराविषयीचे ममत्व व्यक्त करताना ती उद्गारते ः ‘‘घर ही एक व्यवस्था असते, एक आधार असतो. हा आधार हवा असेल तर काही तडजोडी करणे आलेच! केवळ घेत्याची भूमिका घेऊन कसे भागेल? एकीकडे काही घेताना दुसरीकडे काही देणेही आलेच. आणि ही देवाणघेवाण व्यावहारिक पातळीवरची नसून भाविक पातळीवरची आहे.’’
गतिमान काळातील स्त्रीच्या भूमिकेच्या बाबतीत लेखिकेचे चिंतन प्रकट झालेले आहे ः ‘‘…घर ही एक निर्मिती आहे. आजच्या स्त्रीला ती निर्मिती साधू लागली आहे. घराच्या दरवाजापर्यंत उंच गेलेले उंबरठे ती हळूहळू छाटते आहे; त्यांची उंची कमी-कमी होत चाललेली आहे. आता घर तिला निरोप देते, आणि तिचे स्वागतही करते.
कारण घराला तरी स्त्रीखेरीज आणखी कोणाचा आधार आहे?’’
‘इशारा’ या लेखात स्वतःकडे मागे वळून पाहिले आहे. कोल्हापूरसारख्या शहरात संवेदनक्षम वयात तिच्यावर चांगले संस्कार झाले. पारंपरिक मूल्ये जपणार्‍या माहेरी व्रतवैकल्ये यथासांग पार पडली जात असत. त्यामुळे तिचा कल धार्मिकतेकडे होताच. लग्नानंतर मुंबईला आल्यावर तिने एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापनकार्यास प्रारंभ केला. प्रा. खानवेलकर यांच्यामुळे ती ज्योतिष-प्रकरणात गुंतून गेली. एका विचित्र योगायोगाची कथा या लेखात लेखिकेने सांगितली आहे. तिचे वडील आणि प्रा. खानवेलकर हे दोघे एकाच दिवशी गेले, ही खरोखर अनाकलनीय बाब होती.
‘सहा दिवसांचा वानप्रस्थाश्रम’ हा या पुस्तकातील प्रदीर्घ लेख अत्यंत वाचनीय आहे. आत्मानुभूतीचे अनेक रंग त्यात खुललेले आहेत. लेखिका सिमल्याला एका सेमिनारच्या निमित्ताने गेली. तेथील चित्तथरारक अनुभवांविषयी तिने तन्मयतेने लिहिले आहे. त्यातील लालित्य आणि चिंतनशीलता मनाला भावणारी आहे. उदा.
‘‘किनारा आपली वाट पाहत असतो, या विश्‍वासाने परत यायचे. क्षितिज आपले असते आणि किनाराही आपला असतो! त्या दोहोंतल्या अंतरावर प्रेम करायला मात्र शिकले पाहिजे. पूर्ण सुसंवाद शक्यच नसतो, पण निळ्या स्वतःच्या आभाळात तो अभ्रांसारखा सरकत असतो. ती अभ्रे पकडणे म्हणजे एकसंध अस्तित्वाच्या उजेडात उजळून निघणे!’’
‘मायलेकी’मध्ये लेखिकेने आपल्या आईचे हृद्य व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ‘‘माझे लग्न होण्यापूर्वी आम्हां दोघींत असलेले सुंदर, परिपूर्ण नाते तिच्या बाजूने माझे लग्न झाल्यानंतरही, माझ्या आयुष्याला वेगवेगळ्या वाटा फुटल्यानंतरही टिकून राहिले…’’ ही जाणीव लेखिकेला आनंद आणि आधार देते. ‘‘तेराव्या वर्षापासून घरात सोवळ्याने स्वयंपाक करणारी आई कुठून कुठे पोचली होती’’ या उद्गारात तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास दिसतो. अत्यंत प्रगल्भ जाणिवेने लिहिलेले हे व्यक्तिचित्र आहे. आई आणि मुलगी यांच्या नात्यातील विलोभनीय वीण त्यात आढळते.
‘औदुंबर मग्न बसला आहे…’ हा जी. ए. कुलकर्णी या समर्थ कथाकारावरील हा मृत्युलेख आहे. जी.एं.च्या विविध विभ्रमांच्या कथांमधील आशयसूत्रांच्या आधारे त्यांची बलस्थाने लेखिकेने अधोरेखित केली आहेत. तिने म्हटलेले आहे ः ‘‘जी.ए. हा प्रवासी अशी कलदार, जिवंत भाषा मराठी कथेच्या ओंजळीत टाकून निघून गेला.’’
‘आधारवड कोसळल्यानंतर…’ हा प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यावरील मृत्युलेखही लेखिकेने समरसून लिहिला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडून दाखविताना लेखिका उद्गारते, ‘‘त्यांच्या बोलण्यात, लिहिण्यात कोणताही आव नसायचा; शिकवण्यात स्वतःच्या ज्ञानाचा तोरा नसायचा. सर्वांना बरोबर घेऊन जाणे, मग तो वाचक-श्रोता असो वा विद्यार्थी. ही वा.लं.ची शैली होती. नव्हे, ती त्यांची जीवनसरणीच होती. म्हणूनच वा.लं.च्या सहवासात कोणालाही निर्धास्त, मुक्त वाटे; मनावर कोणतेही दडपण येत नसे; संभाषणामधील आनंद घेता येत असे.’’ वा.लं.च्या समीक्षालेखनाचे स्वरूप तिने सांगितले आहे ः ‘‘वा.लं.नी स्वतःसाठी लिहिले, तसे वाचकांसाठी लिहिले. त्यांच्या या समीक्षालेखनात सातत्य व वैविध्य होते. त्यात लेखकांचे, नियतकालिकांचे अभ्यास आहेत; महत्त्वाच्या वाङ्‌मयप्रकारांची तात्त्विक व उपयोजित चिकिसा आहे; वेगवेगळ्या वाङ्‌मयीन प्रश्‍नांची चर्चा आहे; क्वचित मतभेद, समर्थन आहे- पण वा.लं.चे हे चौदा समीक्षाग्रंथ हा मुख्यतः वाङ्‌मयाचा चौफेर ‘शोध’ आहे.’’
‘रणजित ः एक स्वगत’मध्ये रणजित देसाई यांच्या आठवणींना लेखिकेने उजाळा दिला आहे. राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना रणजित देसाई हे त्यांच्या मित्रमंडळीमध्ये साहित्यचर्चा करण्यात रमत असत. स्वतः लेखिका, शंकर पाटील, पुरुषोत्तम पाटील आणि प्रल्हाद वडेर यांनी साहित्यचर्चेत ते मंतरलेले दिवस घालविले. त्यांतील तपशील येथे आलेले आहेत. रणजित देसाई यांना माणसे प्रिय होती. मैत्रभावाचे जुने बंध त्यांनी कधी तोडले नव्हते. त्यांच्या साहित्यसृष्टीतील काही अधोरेखिते लेखिकेच्या निवेदनप्रवाहात येऊन जातात.
‘एक ब्रह्मकमळ मिटले’ हा व्रतस्थ कथाकार अरविंद गोखले यांच्यावरील मृत्युलेख आहे. लेखिकेला ‘साहित्य सहवास’मध्ये त्यांचा सहवास लाभला. अरविंद गोखरे यांनी अन्य वाङ्‌मयप्रकार न हाताळता आयुष्यभर कथासाधना केली. अर्धशतकाच्या कथालेखनप्रवासात कथा या साहित्यप्रकाराची नवीनवी रूपं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध प्रयोग केले. ‘‘त्यांच्या मनात अखंडपणे पेटत राहिलेले ते अग्निहोत्र होते. ते पेटते राहावे यासाठी आवश्यक असणारी तपश्‍चर्या गोखल्यांनी अगदी विनासायास, आनंदाने केली,’’ असे अर्थपूर्ण उद्गार लेखिकेने काढलेले आहेत.
‘संस्कृती नावाचा महावृक्ष’ हा पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्यावरील मृत्युलेख आहे. पारंपरिक ज्ञानप्रक्रियेकडून आधुनिक साहित्याच्या वळणापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला याविषयीचे विवेचन येथे आलेले आहे. ‘‘संवाद व सर्जन ही त्या अध्यायांची केंद्रे होती. कालांतराने मुक्तिसंग्राम हा आणखी एक अध्याय आला. आणि नंतर ‘संस्कृतिकोश’ हा कलशाध्याय.’’ या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपकळा लेखिकेने सांगितल्या आहेत. त्यांना ‘‘जीवनाचे प्रयोजन सापडले होते आणि जीवननिष्ठा पक्की होती. त्या प्रयोजनाचे सतत स्मरण ठेवून, निष्ठेने जीवनप्रवास सुरू राहिला. या प्रवासातील प्रत्येक वळण नियोजित प्रयोजनाशी सुसंगत होते,’’ हे तिने मर्मज्ञतेने प्रतिपादन केले आहे. व्युत्पन्नता आणि रसज्ञता यांचा मनोज्ञ मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. ज्ञानयज्ञासाठी समर्पित असे हे जीवन होते असे लेखिकेला वाटते.
‘मंत्रपुष्प’मध्ये नामवंत साहित्यिकांच्या तिला आलेल्या पत्रांमधील अंतरंगदर्शन उलगडून दाखविले आहे. हा एका परीने सृजनप्रक्रियेचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज असतो. शिवाय त्यात भावनात्मक ओलावा असतो.
‘कलशाध्याय’ या लेखात लेखिकेने कुसुमाग्रजांच्या कवितांविषयीच्या आठवणी जागविल्या आहेत. त्यांतील भावविश्‍व सूत्रमय पद्धतीने उलगडून दाखविले आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांइतकेच त्यांचे व्यक्तिमत्त्व अभिजात स्वरूपाचे होते हे लेखिकेने सांगितले आहे. ‘‘कुसुमाग्रजांची कविता ‘छंदोमयी’ राहिली आणि छंदोमय कुसुमाग्रजांनी मुक्तायन लिहिले! कुसुमाग्रजांची ही दोन आविष्कारविश्‍वे एकमेकांना आजतागायत भेटत राहिली.’’ हे निरीक्षणही तिने नोंदविले आहे.
‘पडद्यामागचे ‘पिएल्’ या लेखात ‘आहे मनोहर, तरी…’ या सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मकथनामुळे साहित्यरसिकांसमोर पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही वेगळे पैलू आले. ‘‘ती व्यक्ती न राहता एक व्यक्तिरेखा बनली,’’ असे लिखिकेने म्हटले आहे. हे व्यक्तिमत्त्व अधिक सुस्पष्ट, अधिक लोभस करणार्‍या या आठवणी आहेत असेही तिला वाटते.
‘लेखक श्री.पु.’ हा प्रथितयश संपादक- प्रकाशक. प्रा. श्री. पु. भागवत यांच्या सृजनशील आणि समीक्षात्मक लेखनावरील सविस्तर लेख लेखिकेने लिहिला आहे. नवी वाङ्‌मयीन मूल्ये आणि नवी संवेदनशीलता वाङ्‌मयक्षेत्रात रुजविणार्‍या या प्रज्ञावंताचा हा अनोखा पैलू तिने अभ्यासपूर्णरीत्या अधोरेखित केला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे.
श्री. पु. भागवतांच्या आग्रहानुसार ‘मौज-सत्यकथा’चे संपादकीय काम सांभाळणारे ग. रा. कामत यांची तीन रूपे लेखिकेने रेखाटली आहेत. ग. रा. कामतांचे हे कार्य काहीसे अलक्षित राहिले. परीक्षणे, समीक्षा या प्रांतात त्यांनी ‘अनिरुद्ध’ या नावाने मुक्तपणे मुशाफिरी केली. पुढे ते चित्रपटक्षेत्राकडे वळले. त्यांनी काही पटकथा लिहिल्या. त्यांचे तपशील लेखिकेने दिले आहेत.
‘के. ज. पुरोहित की ‘शांताराम?’’ हा प्रा. के. ज. पुरोहित यांच्यावरील लेख लेखिकेने लिहिला आहे. नवकथेच्या ऐन बहराच्या काळात शांताराम यांनी सकस कथालेखन केले. चार्मोशी, चांदा, नागपूर व अमरावती इत्यादी ठिकाणी भ्रमंती करीत शांताराम मुंबईला आले आणि इंग्रजीचे अध्यापन करू लागले. सुरुवातीला त्यांनी काही लघुनिबंध लिहिले. बहुरंगी मुंबईच्या जाणिवा रुजूनही त्यांची देशी जाणीव अबाधित आहे. तिने दिलेला एक निराळाच संवेदनस्वभाव आजतागायत जपला गेला आहे, असे लेखिकेचे मत आहे. त्यांच्या कथेच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात लेखिका म्हणते ः ‘‘त्यांनी जाणूनबुजून कोणतेही प्रयोग केले असे वाटत नाही. पण या कधी ऐसपैस, तर कधी नेमस्त, कधी बोलघेवड्या, तर कधी मितभाषी, कधी सूचक, तर कधी सकस निर्णय घेऊन निश्‍चित उत्तरे देणार्‍या, कधी काव्यात्म, प्रतीकात्मक, तर कधी सरधोपट कथेत संवेदाचे व निवेदनाचे नाना ढंग आहेत.’’
‘अनुबंध’मधून वाङ्‌मयीन इतिहासाची अलिखित पाने लालित्यपूर्ण शैलीत सशब्द झालेली आहेत. लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वातील प्रसन्नतेचा अंतःसूर येथे अभिव्यक्त झालेला आहे.