अनामूल, ताईजुल बांगलादेश संघात

अनामूल हक व ताईजुल इस्लाम यांचे बांगलादेशच्या १४ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने काल मंगळवारी श्रीलंका दौर्‍यासाठी आपला संघ जाहीर करताना शाकिब अल हसन व लिटन दास यांना विश्रांती दिली.

बांगलादेशच्या विश्‍वचषक संघाचा सदस्य राहिलेल्या अबू जायेद याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अनामूलने जवळपास १२ महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. तर कसोटी स्पेशलिस्ट फिरकीपटू ताईजुलने २०१६ साली सप्टेंबर महिन्यात शेवटच्या वेळी वनडे लढतीत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले होेते. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीमुळे या दोघांची निवड करण्यात आल्याचे निवड समिती प्रमुख मिन्हाजुल आबेदिन यांनी सांगितले आहे.

विश्‍वचषकानंतर मश्रफी मोर्तझाच्या निवृत्तीची चर्चा होती. परंतु, त्याने संघातील स्थान व कर्णधारपद कायम राखले आहे. मुश्फिकुर रहीम, मोहम्मद सैफुद्दिन व महमुदुल्ला यांना तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. बांगलादेशचा संघ २६, २८ व ३१ जुलै रोजी कोलंबोच्या प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

बांगलादेश संघ ः मश्रफी मोर्तझा, तमिम इक्बाल, सौम्य सरकार, अनामूल हक, मोहम्मद मिथुन, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, मोसद्देक हुसेन, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराझ, ताईजुल इस्लाम, रुबेल हुसेन, मोहम्मद सैफुद्दिन व मुस्तफिझुर रहमान.