अध्ययनात ‘चेतक’ महत्त्वाचा

अध्ययनात ‘चेतक’ महत्त्वाचा

  • प्रदीप मसुरकर

एखादे शैक्षणिक साधन चांगले कुतूहल निर्माण करणारे असेल तर आपोआपच ते अगदी चुंबकाप्रमाणे मुलाचे लक्ष वेधून घेते. आवड व कुतूहल या दोन्हींच्या बेरजेतून सहभाग वाढीस लागतो. मूल प्रतिसाद देऊ लागते. उत्तर देण्यास किंवा प्रश्‍न विचारण्यास सुरुवात करते. ते एखादी कृती स्वतः करून पाहण्यास धडपडते. त्याद्वारे शिक्षकाच्या अध्यापन क्रियेत सहभागी होते.

‘‘किती जीव तोडून, ओरडून शिकवलं तरीही मुले शिकत नाहीत. या मुलांना सांगून सांगून आमचा जीव अर्धा झाला. परीक्षेत काय करणार कोण जाणे!’’
‘‘मुलांना सरळ, सोपे करून शिकवले, प्रश्‍नोत्तरे देऊन पाहिलीत, परीक्षेत महत्त्वाचे काय तेपण सांगितले, तरीपण परीक्षेत गुण कमीच!’’
‘‘शिकवताना या मुलांचे लक्षच नसते. काहीतरी आवाज काढणार, जागा बदलणार, फळ्यावर दिलेले वहीत लिहून घेणार नाहीत, प्रश्‍नोत्तरे वहीत लिहिणार नाहीत, एकही वही पूर्ण नाही.’’
या किंवा अशाच प्रकारच्या अन्य अनेक तक्रारी शिक्षकांकडून होत असलेल्या आपल्या कानावर येत असतात. याशिवाय अनेक शिक्षकांची वर्ग नियंत्रणाची समस्या असते. एखादा शिक्षक हुशार, आपल्या विषयात अगदी पारंगत असूनसुद्धा त्यालाही वर्गनियंत्रणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
वरील उदाहरणाकडे पाहिले असता आपल्या समोर प्रश्‍न उभा राहतो, चूक कोणाची? मुलांची की शिक्षकांची? की अध्यापन पद्धत चुकीची? हे सर्व जाणून घेण्यासाठी प्रथम अध्ययन प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

कशी असते अध्ययन प्रक्रिया?

अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाविषयी निरनिराळ्या तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल किंवा इष्ट बदल. प्रत्येक शिक्षकाला, पालकाला वाटते की, आपल्या मुलामध्ये अपेक्षित बदल व्हायला हवा. त्यासाठी एखादा पालक आपल्या पाल्याला एखाद्या ठरावीक शाळेत पाठवतो व त्यानंतर आपल्या मुलामध्ये अपेक्षित वर्तनबदलाचे चित्र रेखाटतो. कोणताही अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी अपेक्षित वर्तनबदल म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि अनेकांना ते न समजल्यामुळेच अध्ययन प्रक्रिया, अध्ययन, वर्तन बदल यात अडथळे निर्माण होतात. हा अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी त्याचे मूळ जाणून घेणे आवश्यक आहे.

समजा एखाद्या मुलाने हातात कोणत्याही एखाद्या झाडाचे चित्र समोर धरून प्रश्‍न केला, ‘‘यातील महत्त्वाचा भाग कोणता?’’ तर अनेकांकडून उत्तर येईल ‘मूळ’. कुठल्याही झाडाच्या वाढीसाठी, प्रथम त्याचे मूळ जमिनीत घट्ट धरणे महत्त्वाचे असते. अध्ययनरूपी झाडाचेही मूळ हेच महत्त्वाचे आणि हे ‘मूळ’ म्हणजे ‘चेतक’ म्हणजेच ‘स्टिम्यूलस’. अध्ययनात हा चेतक महत्त्वाचा! अनुभव असा आहे की, शिक्षकांना जर आपण चेतक म्हणजे काय असा प्रश्‍न विचारला तर त्याचे अचूक उत्तर मिळेलच असे सांगता येणार नाही. हे असे का?

चेतकाची किमया
‘चेतक’ म्हणजेच ‘स्टिम्यूलस’ म्हणजेच उत्तेजन देणारी गोष्ट- हे अध्ययनाचे प्रेरणास्थान मानला जाते. मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, आवाज असेल, शिकवण्याची पद्धतीही असेल किंवा शैक्षणिक साधनही असू शकेल. आवाजातील चढ-उतार, शिक्षकाचा पेहराव, वृत्ती त्यानुसार आजूबाजूची एखादी वस्तू, प्राणी अशाप्रकारे सर्वकाही ‘चेतक’ या संकल्पनेत सामावू शकते. यांपैकी शिक्षक शिकवताना कशाचा, कोणत्या वस्तूची निवड करून कसा उपयोग करतो हा भाग महत्त्वाचा. त्यावरून अध्ययनाची सुरुवात होते. म्हणजेच चेतक जर आकर्षक- लक्ष वेधून घेणारा, कृतीयुक्त असेल तर मुलाचे त्याकडे साहजिकच लक्ष, अवधान खेचले जाते. टिकून राहते. म्हणजेच चेतक हा लक्ष वेधून घेणारा असावा लागतो, हे आपल्या ध्यानात आले असेलच.
चुंबकाप्रमाणे मुलांचे लक्ष ते वेधून घेते व त्यातूनच मुलांमध्ये आवड, कुतूहल निर्माण होते. शैक्षणिक साधन चांगले असेल, मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणारे असेल तर ते आपोआपच चुंबकाप्रमाणे मुलांचे लक्ष वेधून घेते. आवड, कुतूहल या दोन्हींच्या बेरजेतूनच सहभाग वाढीस लागतो. मूल प्रतिसाद देते, उत्तर देण्यास प्रवृत्त होते, प्रश्‍न विचारू लागते. एखादी कृती स्वतः करण्यास तयार होते व शिक्षकाच्या अध्यापन प्रक्रियेत सहभागी होते. लिहिणे, वाचणे, फळ्यावर लिहिणे, चित्र काढणे, कृती करणे या क्रिया आपोआपच होत जातात. पण त्यासाठी चेतकसुद्धा तितकाच प्रभावी व आकर्षक असावा लागतो. चेतकाची तीव्रता ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात मुलाचे अवधान कमी-जास्त होते व त्यातूनच आवडनिर्मीती होत असते. एखादे शैक्षणिक साधन चांगले कुतूहल निर्माण करणारे असेल तर आपोआपच ते अगदी चुंबकाप्रमाणे मुलाचे लक्ष वेधून घेते. आवड व कुतूहल या दोन्हींच्या बेरजेतून सहभाग वाढीस लागतो. मूल प्रतिसाद देऊ लागते. उत्तर देण्यास किंवा प्रश्‍न विचारण्यास सुरुवात करते. ते एखादी कृती स्वतः करून पाहण्यास धडपडते. त्याद्वारे शिक्षकाच्या अध्यापन क्रियेत सहभागी होते. त्याच्याकडून लिहिणे, वाचणे, चित्र काढणे, फलक लेखन करणे, विचार करणे या सर्व क्रिया होऊ लागतात, पण यासाठी तितकाच प्रभावी व परिणाम घडवून आणणारा ‘चेतक’ हवा. कृती, आवाजातील चढ-उतार, योग्य गोष्टीची निवड, नाट्यकृती यांचा समावेश चेतकांत होत असतो आणि तेच खरे प्रेरणास्रोत ठरतात.

सरावानेच होतात कायमस्वरूपी बदल

एखादी गोष्ट, कृती मुलांना आवडली की त्यातूनच सरावास सुरुवात होत असते. अध्ययनात सराव आवश्यक असतो. लिहिणे, वाचणे, गणिते सोडविणे, सायकल, गाडी चालविणे अशा कितीतरी गोष्टी सरावानेच अवगत होत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. त्यासाठी सरावाची गरज असते. या सरावामुळे वर्तनात – वागणुकीत कायमस्वरूपी बदल होण्यास मदत होते. चांगल्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी सरावाची गरज असते. वाचन, लेखन, पोहणे, सायकल चालविणे या गोष्टी करावयास मिळाल्या नाहीत तरीही ती कौशल्ये विसरली जात नाहीत. याचा अर्थच वर्तन-बदल हा कायमस्वरूपी झाला की अध्ययन झाले, असे म्हटले जाते. अनेकदा मुलांना वाईट सवयी लागतात, त्यासुद्धा सरावानेच जडलेल्या असतात. येथेही अध्ययन प्रक्रिया झालेलीच असते. हे अध्ययन कायमस्वरूपीच असते. फक्त ते अपेक्षित असते. समाजात काही गुंड प्रवृत्तीच्या, वाईट कृत्ये करणार्‍या व्यक्ती आढळतात. त्यांना बर्‍याच वाईट सवयी, अतिरेकी प्रवृत्ती असतात, पण हे चांगल्या अध्ययनाचे लक्षण मानले जात नाही.

एखादा अनुभव आमच्या जीवनात योग्य, अपेक्षित बदल घडवून आणतो. एके दिवशी एक अधिकारी गोव्याहून मुंबईला जात होते. ट्रेन अगदी सकाळीच लवकर असल्यामुळे चहा-नाश्ता घरी न करताच ते स्टेशनवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. ट्रेन फलाटावर लागताच ते आपल्या सीटवर बसले. इतक्यात एक मुलगा चहा व वडा-पाव घेऊन तेथे आला. साहजिकच याने दोन वडा-पाव व चहा मागवला व आपला नाश्ता केला. ट्रेन चालू झाली. गाडी रत्नागिरीच्या जवळ आली त्याच वेळी या गृहस्थाच्या पोटात मळमळू लागले. ओकार्‍या येऊ लागल्या. एक-दोनवेळा संडासला जावे लागले. एका स्टेशनवर गाडी थांबताच एका सहप्रवाशाच्या मदतीने स्टेशनवर सामानासह उतरला. स्टेशनमास्तराला हे सर्व सांगितले. त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमीट केले गेले. दोन-तीन दिवसांनी त्याची प्रकृती सुधारली. मुंबईच्या कामासाठी योग्य वेळी न पोहोचल्याने त्याने पुन्हा माघारी येण्यासाठी ट्रेन पकडली. आता मात्र त्याचे विचारचक्र सुरू झाले. त्या वडापावामुळेच आपल्याला हा त्रास झाला, हा त्याचा समज पक्का झाला. का बरे असे घडले? ते वडा-पाव शिळे असतील, वापरलेले तेल चांगल्या प्रतीचे नसेल. त्यात काही जीवजंतू पडले असतील, अशी एक ना दोन.. बरीच कारणे समोर आली. गाडी पुढच्या स्टेशनवर येताच एक वडापाववाला मुलगा त्या डब्यात शिरला. त्याच्याजवळ येऊन विचारताच याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण त्याने स्वतःला सावरले.

या अनुभवातून मात्र त्याने एक धडा घेतला. त्यानंतरच्या काळात त्याने ट्रेनमधील चहा, भाजी, पाव याला कधीच हात लावला नाही. इतकेच नव्हे तर आपला हा अनुभव सहप्रवाशाला कथन करून त्यांनाही न खाण्यास विनंती करायचे. आपल्या पुढील आयुष्यात त्याने या गोष्टीची कधीच पुनरावृत्ती केली नाही. सराव केला नाही. एका अनुभवावरूनच त्याच्या वर्तनात व विचारात, आचरणात बदल झाला. अनेकदा आपल्या वर्तनात, कृतीत बदल घडण्यास चांगले किंवा वाईट अनुभव कारणीभूत ठरत असतात… हेही अध्ययनच!!
एकदा का आपण केळ्याच्या सालीवर पाय पडून घसरून पडलो तर पुन्हा त्याचा सराव करणार नाहीच, उलट कधी अशी पडलेली साल दिसली तर ती साल उचलून टाकण्यासाठी आपला हात पुढे होतो. इतकेच नव्हे तर आपण साल तशी रस्त्यावर फेकत तर नाहीच, पण तसे न करण्यास इतरांनाही सांगत असतो. हा आपल्या वर्तनात कायमस्वरूपी बदल घडून आलेला असतो.
आपल्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ‘सराव’ लागतो तर काही वेळा अनुभव कारणीभूत ठरतो. आपल्या अध्ययनाची सुरुवात चेतकापासून होते. चेतक असेल तेथे अवधान, त्यातून आवड, नंतर सराव तर काही वेळेस अनुभव, मग योग्य तो कायमस्वरूपी वर्तनबदल असे दिसून येते.
समीकरण
चेतक = अवधान = कुतूहल = आवड = अनुभव = सराव = अनुभव = योग्य तो कायम स्वरूपी वर्तनबदल = अध्ययन.

चेतकाची किमया – काही अनुभव, काही प्रयोग

१. मी गोव्यातील एका सरकारी हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून काम करीत असताना सन १९८४ मध्ये ‘अवकाशातील दळणवळण’ हा विज्ञान प्रकल्प सादर केला. राज्यस्तरावर त्याला पहिला तर विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. आज इतक्या वर्षांच्या कालावधीनंतरही त्या प्रकल्पात सहभागी झालेले विद्यार्थी तसेच तो प्रकल्प पाहिलेले प्रेक्षक त्या प्रकल्पाचे स्मरण करतात. ही असते चेतकाची तीव्रता.
२. गोव्यातील एका हायस्कूलमध्ये मी विडी-सिगारेटचे दुष्परिणाम दाखवणारी प्रतिकृती केली होती. ही प्रतिकृती सुमारे शंभर ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. ज्यांनी ज्यांनी ती प्रतिकृती पाहिली, अनुभवली ते आज तीस वर्षांच्या कालावधीनंतरही त्याचे वर्णन करतात. ही असते त्या प्रतिकृतीरूपी चेतकाची किमया.
३. एका हायस्कूलमध्ये मी मुलांच्या सहभागातून विद्युतशक्तिशिवाय चालणारं मिक्सर तयार केलं. त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. तो पाहिलेल्या पाच हजार प्रेक्षकांपैकी अनेकजण त्याचा उल्लेख आजही करतात. येथे दिसून येते चेतकाची किमया.
४. एके वर्षी गोव्यातील मुख्याध्यापकांसाठी विद्यार्थीकेंद्रित आनंददायी कृतीयुक्त अध्ययन या सत्रात हवेची संकल्पना स्पष्ट करणारे चार प्रयोग दाखविले. त्यात गरम पाणी, प्लास्टिकची बाटली व थंड पाणी यांचा वापर केला. (कालावधी १५ मिनिटे) त्यामध्ये १) पाऊस कसा पडतो? २) वातावरणातील दाब,
३) वादळ कसे निर्माण होते? ४) समुद्रात कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो… हे कृती करून दाखवले व अध्ययनाची सुरुवात योग्य चेतकापासून होते हे पटवून दिले. त्यात सहभागी सदस्यांचे गट करून त्यांना घटक वाटून दिले. पंधरा मिनिटांच्या चर्चेनंतर प्रत्येक गटाने सादरीकरण केले. सर्वजण त्यात इतके समरस होऊन गेले की ते आपला मुख्याध्यापक हा हुद्दा विसरूनच गेले होते. त्या सादरीकरणात १) हवेच्या प्रदूषणाविषयी नाट्य, २) हवेची संकल्पना, ३) हवा, पाणी यामधील साम्य, ४) हवेची गरज नसेल तर काय होईल याचे कथन,
५) हवेचे गुणधर्म आणि स्पष्टीकरण – हे घटक घेतले. त्या तासा-दीड तासात ‘हवा’ या घटकाबद्दल जास्तीत जास्त माहिती संकलीत करून ती अभिनय, नाट्य, वाचन, कृती या माध्यमांद्वारे सादरीकरण केले. यात माझी भूमिका चेतकाची होती म्हणजेच माझी कृती चेतकाची होती.
योग्य चेतक असेल तर तोच खरी प्रेरणा ठरतो. तीच प्रेरणा अध्ययनास गती देते, वर्तन-बदल होतो… तोही कायमचा! म्हणूनच प्रत्येक शिक्षकाने योग्य असा ‘चेतक’ ‘स्टिम्यूलस’ ‘प्रेरणादायी गोष्ट’ निवडणे आवश्यक आहे, हेच खरे!