अधिवेशनाबाबत अद्याप निर्णय नाही

>> उपसभापतींची माहिती

येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असून हे अधिवेशन कधी घ्यावे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती काल उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. पावसाळी अधिवेशनाबाबत १५ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी अनधिकृतरित्या काही पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, अधिवेशनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे उपसभापती फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशन घ्यावे लागणार असल्याचे त्याबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी लागणार आहे त्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

६ ऑगस्टपर्यंत अधिवेशन
घ्यावे लागेल ः कामत
दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना विचारले असता शेवटचे अधिवेशन हे फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेला झाले होते. त्यामुळे आता ६ ऑगस्टपर्यंत तरी पावसाळी अधिवेशन घ्यावेच लागेल. गेल्या अधिवेशनात सहा महिन्यांसाठीच्या लेखानुदानाला मंजुरी देण्यात आली होती. आता अधिवेशनात अर्थसंकल्पाला संमती द्यावी लागेल, असे कामत म्हणाले.