अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च…|

– प्रा. रमेश सप्रे
भगवद्गीतेत भगवंतांनी आदर्श माणसाची लक्षणं अनेकठिकाणी सांगितली आहेत. त्यांचा हा आदर्श माणूसकधी भक्त असतो, तर कधी ज्ञानी, कधी कर्मयोगी तर कधी ध्यानमार्गी असतो. सर्व प्रसंगात स्थिर बुद्धी व वृत्ती असणारा तो कधी स्थितप्रज्ञ असतो किंवा तम-रज-सत्त्व या त्रिगुणांच्या पलीकडे असलेला गुणातीत असतो. भगवंत या सार्‍या पैलूंची लक्षणं सांगताना एक गोष्ट मात्र आपल्या मनावर ठसवू पाहतात. ती म्हणजे या सार्‍यांची बहुतांश लक्षणं ही समानच असतात. म्हणजे ज्ञानी व कर्मयोगी किंवा भक्त व ध्यानयोगी हे मुळात एकाच स्वरूपाचे असतात. काही गुणच भिन्न असतात. एरवी प्रत्येक व्यक्तीची काही खास वैशिष्ट्यं सोडली तर एकूण सारे एकाच स्वभावाचे असतात. भक्ताची लक्षणं सांगताना एकामागून एक अनेक लक्षणं किंवा स्वभाववैशिष्ट्ये सांगतात. यामुळे भक्त बनणं फार अवघड नाही असा विश्‍वास निर्माण होतो. सगळी नाही तरी काही वैशिष्ट्ये (स्वभावविशेष) अंगी बाणवली तरी भगवंताची भक्ती समाधानकारक रीतीनं करता येईल. ही भक्त-वैशिष्ट्ये आपल्या सामान्य जीवनातही खूप उपयोगी पडतात. या संबंधातलं समुपदेशन हेच शिकवतं.
भक्तलक्षणांचा विचार काही उदाहरणांच्या आधारे करुया-
१. अद्वेष्टा सर्वभूतानाम् – सरळ अर्थ आहे सर्व भूतमात्रांवर प्रेम करणारा म्हणजेच कोणाचाही द्वेष न करणारा(अद्वेष्टा). ख्रिस्ती संत फ्रान्सिस ऑफ ऍसिसची गोष्ट सांगतात. तो सर्व चराचरावर अत्यंत प्रेम करायचा. ‘द्वेष’ हा शब्द जणू त्याला माहीतच नव्हता. याचा परिणाम म्हणून तो रानावनात कोठेही असला तरी अनेक हिंस्त्र प्राणीसुद्धा आपलं वैर विसरून फ्रान्सिसभोवती जमत. या अतीव प्रेमामुळे त्याला पशुपक्षांची भाषा अवगत होती. त्याच्या भोवतीचा विविध पशुपक्ष्यांचा मेळावा पाहिला की खरंच तो सार्‍या सृष्टीवर प्रेम करणारा देवदूतच वाटे.
२. मैत्र – निष्कपट, निरपेक्ष प्रेमातून मैत्र (मैत्रीचे संबंध) साकारणारे ज्ञानेश्‍वर पसायदानात याच मैत्रीचा उल्लेख करतात. ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे!’ खरं तर संबंध प्रेमाचे, मैत्रीचे असणं साहजिक आहे. हरण-वाघ एकमेकांचे शत्रू नाहीत जरी हरण हे वाघाचं भक्ष्य (खाद्य) आहे. असं असणं ही वस्तुस्थिती आहे. पद्धती आहे. पण ऋषींच्या आश्रमात हे सारं नैसर्गिक मैत्र प्रत्यक्षात व्यक्त झालेलं वर्णनातून पहायला मिळतं. मैत्री व्यावहारिक असते पण मैत्र हे निसर्गदत्त असतं. अकृत्रिम असतं. मानवाच्या स्वभावात याच्या विरुद्ध भाव उभे राहतात. म्हणून जगात आज आढळून येणारी असुरक्षितता व शत्रुता अनुभवायला मिळतात. निदान भक्तानं तरी सर्वांशी मैत्र भावनेनं वागलं पाहिजे.
३. करुण – कारुण्यभाव, दया या गुणांची आज जगाला आवश्यकता आहे. युद्ध, हिंसा, अपराध, गुन्हेगारी यांनी खचाखच भरलेल्या जगात करुणेची गरज आहे. पॅशन (तीव्र भावना-विशेषतः इच्छा, वासना) आजच्या युगाचा धर्म बनलाय. पण आवश्यकता आहे ती कंपॅशन म्हणजे करुणेची. गौतम बुद्धाच्या जीवनकार्यात ‘करुणा’ प्रामुख्याने दिसून येते. संत हे कारुण्यमूर्तीच असतात. सीता एकांतात असताना राघवाला करुणानिधान म्हणत असे. आपण सीतेलाच भेटून आलोय याची खात्री सर्वांना विशेषतः रामाला पटावी म्हणून बुद्धिवान हनुमानानं तिला हा परवलीचा शब्द (पासवर्ड) विचारला होता. भगवंताचं किंवा संतसद्गुरुंचं वर्णन ‘अकारण करुणासागर’ किंवा ‘अहेतुक करुणासमुद्र’ असे म्हणतात ते या ‘कारुण्य भावा’साठीच!
४. निर्मम – रामकृष्ण म्हणत, ‘देव दोनदा हसतो. ज्यावेळी कोणीही ‘मी कर्ता’ या भावनेनं ‘मी(अहं)चा उपयोग जेव्हा करतो तेव्हा त्याच्या अहंकाराला पाहून देव हसतो. त्याचप्रमाणे ‘हे माझं- ते माझं’ असं कोणी म्हणतो त्यावेळी देव दुसर्‍यांदा हसतो. सगळ्याचा मूळ स्वामी जर परमेश्‍वर आहे तर मध्ये ‘हे माझं’ म्हणणारा ‘चोर’ कोठून आला? शेतकर्‍यांनी खूप श्रमानं शेतं पिकवली तरी मीन, पाणी, सूर्यप्रकाश, अवकाश, वारा या गोष्टी काही त्यांनी ‘बनवलेल्या’ नसतात. कागदोपत्री आलेल्या मालकीनं ‘ही जमीन माझी’ असं म्हणणं हे मत्व चुकीचं आहे. ज्ञानमार्गी किंवा कर्मयोगी सुद्धा असा विचार करत नाहीत. मग भक्त तर ‘सारं त्या परमेश्‍वराचं’ असं मानूनच सारं करत राहतो.
५. निरहंकार – अहंकार हा प्रत्येकाला मुळात असतोच, पण तो ‘अहं’-कार या स्वरूपात. आपल्या अंतःकरणाचे चार पदर किंवा पैलू मानले जातात. मन-बुद्धी-चित्त नि ‘अहं’-कार! ‘मी आहे’- ही शुद्ध जाणीव प्रत्येकाला असते. अगदी पूर्ण अंधारात ‘माझं’ काहीही अगदी शरीरसुद्धा दिसत नसलं तरी ‘मी आहे’- हे भान मात्र कायम असतंच. पण आपण ज्याला ‘अहंकार’ म्हणतो तो म्हणजे संकुचित अभिमान असतो,. गर्व असतो. ‘मी कर्ता’ हा भाव असतो. हा अहंकारच(इगो) आपल्या जीवनातील अन् तसं पाहिलं तर जगातील अनेक समस्यांच्या मुळाशी असतो. आपण संतांचंच नव्हे तर अगदी प्रामाणिक वारकर्‍याचं, खर्‍या भक्ताचं दैनंदिन जीवन जरी पाहिलं तर त्याची नम्रता, निरहंकार स्वभाव आपल्याला दिसून येतो. हे निरहंकार होणं मात्र खूप अवघड असतं.
६. समदुःखसुख – हा तर भगवंताचा आवडता गुण आहे. कृष्णाच्या जीवनात तर याचं प्रत्यंतर अनेकदा होतं. युद्धात जय त्यानं अनेकदा मिळवला पण कधी जल्लोश केला नाही की अतिआनंदाचं प्रदर्शन केलं नाही. कंस, शिशुपाल, नरकासुर, कालयवन आदी महाबलवान तितकेच भयंकर असलेल्या राजांना कृष्णानं थंड माथ्यानं, आवश्यक तेवढा बळाचा वापर करून मारून टाकलं. शांतपणे त्यांची सत्ता त्यांच्याच वारसांकडे सोपवून तो सहजपणे परतला. अभिमन्यूचा दुष्टपणे केलेला वध पाहूनही तो फार खचून गेला नाही. तसंच आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्याचीच मुलं-नातवंडं-इतर यादवबंधू एकमेकात लढत असताना थंड माथ्यानं त्यानं तो सर्वनाश पाहिला. एवढंच नव्हे तर उर्वरित उन्मत्त यादवांना त्यांचं आपल्याशी असलेलं नातं न पाहता त्यानं मारून टाकलं. आपल्या प्रेमानं वसवलेल्या सोन्याच्या द्वारकेचं सागरातलं होऊ घातलेलं ‘विसर्जन’ही त्यानं शांतपणे स्वीकारलं. तो खरा स्थितप्रज्ञ होता. सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान, निंदा-स्तुती या सार्‍या द्वंद्वात तो स्थिर होता. साक्षीभावानं त्यानं आपल्या व आपल्याशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींच्या जीवनाकडे व आपल्या जीवनातील घटनाप्रसंगांकडे पाहिलं. आपल्याला हे अवघड असलं तरी अशक्य नाही अन् आवश्यकही आहे.
७. क्षमी – क्षमाशील असणं यासाठी मोठं धैर्य लागतं. आपल्यात सूडाची वृत्ती बळावणं अजिबात अवघड नसतं. पण दुसर्‍या कुणीही आपला अपमान किंवा आपलं नुकसान केल्यावरही मोठ्या मनानं त्याला क्षमा करणं नि त्याचा अपराधच नव्हे तर क्षमा केलेलंही विसरून जाणं हा गुण खर्‍या भक्तात असतो. नेहमी आपण म्हणतो ‘क्षमा करा नि विसरुन जा (फरगिव्ह अँड फरगेट)’. यात क्षमा करून विसरणं अवघड असलं तरी दुसर्‍यांनी केलेले छोटेमोठे अपराध विसरून जाणं तरी शक्य आहे ना? नाही तर मग सूडाची भावना मनात निर्माण होऊन सूडचक्र सुरू राहतं. महाभारतातील अनेक प्रसंग अशा सूडपरंपरेतून निर्माण झालेले आहेत पृथ्वीचं एक नाव ‘क्षमा’ असं आहे. आपण आपले सारे व्यवहार पृथ्वीवर म्हणजे जमिनीवरच करतो. त्यासाठी तिला खणतो, जाळतो, घाण(प्रदूषित) करतो तरीही अजूनही एक दाणा तिच्यात पेरल्यावर ती असंख्य दाणे असलेली कणसं आपल्याला देतेच. अपकारकर्त्याला पुष्पगुच्छच देण्यासारखीच ही गोष्ट आहे. कोणालाही त्याच्या कोणत्याही कृत्याबद्दल क्षमा करण्यासाठी किंवा त्याच्या कोणत्याही कृतीला क्षमाशील अंतःकरणानं पाहण्यासाठी आपलं मन खूप विशाल असावं लागतं. खर्‍या भक्ताचं अंतःकरण असं विशाल, क्षमावान असणं आवश्यक असतं. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण सार्‍या घटना त्या सर्वशक्तिमान परमेश्‍वराची इच्छा म्हणून पाहू तेव्हाच! यासाठी परमेश्‍वराला शरणागतीच्या भावानं भजणं नि त्याचं सर्वांवर श्रेष्ठत्व मानणं अत्यावश्यक असतं.
८. सततं संतुष्टः – भक्ताची ही सारी लक्षणं एकमेकांवर अवलंबून आहेत. एकमेकांशी जोडलेली आहेत. जो ‘सुखदुःखात सम’ असतो नि ‘क्षमी’ असतो तोच सतत संतुष्ट असतो. संतोष ही मनाची संतुलित अवस्था असते. मनासारखं झालं की उंच उडायचं नि मनाविरुद्ध झालं की खोल बुडायचं अशा परस्परविरुद्ध प्रतिक्रिया देत राहिलं तर सदैव समाधानी राहणं अशक्य आहे. तुकोबा या बाबतीत आदर्श आहेत. काहीही घडलं तरी पांडुरंगाची इच्छा म्हणून हंसत हंसत स्विकारायचं हा त्यांनी जीवनधर्मच मानला होता. मग दुष्काळ पडो; घरातली जवळची माणसं मरोत; व्यापार व्यवसाय बुडो; शरीराचे खूप हाल होवोत यांच्या अंतरीची समाधानाची ज्योती कधी विझणं तर सोडाच पण साधी हलली सुद्धा नाही. विंदा करंदीकर आपल्या ‘हे आइनस्टाईन’ या कवितेत त्या महान वैज्ञानिकाबद्दल अगदी अस्संच म्हणतात, ‘दोन महायुद्धांची वेडी वादळं… आपटून गेली तुझ्या खिडकीवर… पण हलली नाही तुझी ज्योत… हे आइनस्टाईन!’… तो महान शास्त्रज्ञ सतत आपल्या प्रयोगशाळेत चिंतन व प्रयोगमग्न असायचा. अखंड संतुष्ट असायचा! ज्ञानी-कर्मयोगी-भक्त-ध्यानयोगी यांची वागणूक समानच असते हे भगवंतांनी गीतेत अनेक ठिकाणी सांगितलंय. यात आपल्यालाही समुपदेशन हेच आहे की तुमची वृत्ती कशीही असू द्या, तुम्ही भगवंताकडे म्हणजेच अखंड आनंदाकडे जाण्याचा कोणताही मार्ग शोधत असा तुमच्यात काही गुण अवश्य विकसित व्हायला हवेत. आध्यात्मिक उपासना व प्रपंचाची कर्तव्यभावनेनं केलेली जोपासना यांच्या साह्यानं असा विकास साधता येतो.
९. योगी – गीतेत कर्मयोगी नि संन्यासी यात भेद नाही असंच सांगितलंय.. सर्व कर्म करूनही मी काहीही केलं नाही- ‘सगळं माध्याकडून केलं गेलं’ या अकर्तेपणाच्या भावनेनं सारी कर्मं माझ्याकडून करवली गेली – असं प्रामाणिकपणे म्हणतो तो कर्मयोगी आणि काहीही न करता – कोणतंही कर्म प्रत्यक्ष न करता – सर्व कर्मं ज्या प्रेरणेनं घडतात तो संन्यासी. म्हणजे दोघांकडूनही प्रत्यक्षात सर्व कर्मं घडतच असतात पण घरातली सर्व कामं करणारी ‘आई’ ती कर्मयोगीनी असते तर स्वतः काही न करताही सर्व कामं करवून घेणारा ‘सूर्य’ हा संन्यासी आहे. भक्त हा असा योगी असतो की जो सर्व कर्म देवाची पूजा म्हणून करतो. (स्वकर्मणा तमभ्यर्च्य) ‘स्वकर्मकुसुमांची पूजा’ परमेश्‍वराला अर्पण करतो. ही जीवनपद्धती सर्वांत चांगली आहे.
भक्ताची लक्षणं सांगताना एक जीवनशैली भगवंत आपल्यापुढे ठेवतात. ही निसर्गस्नेही नि मानवस्नेही जीवनशैली आज काळाची गरज आहे. मनावरचा ताण, विविध प्रकारच्या मानसिक नि शारीरिक व्याधींशी झुंजणार्‍या आजच्या मानवाला जीवनातील सारी कर्मं करताना, भोग भोगताना अखंड समाधानात राहण्याची गुरुकिल्ली आहे ही जीवनशैली! भगवंतांना आवडणार्‍या शब्दात म्हणायचं तर यज्ञ जीवनशैली!!