ब्रेकिंग न्यूज़

अतिरिक्त खाते वाटप निर्णय तूर्त स्थगित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्याचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन खात्यांच्या वाटपासंबंधी एक अधिसूचना तयार करून राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी केली होती. तथापि, अतिरिक्त खाते वाटपाची माहिती मान्यतेपूर्वीच जाहीर झाली. अतिरिक्त खाते वाटपाबाबत काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याने अतिरिक्त खाते वाटपाचा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांच्या वितरणाची संपूर्ण तयारी सुरू केली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गृह, वित्त, शिक्षण आदी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली होती. अतिरिक्त खाते वाटपामध्ये उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांना वन, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना राजभाषा आणि सार्वजनिक तक्रार खाते देण्याचे निश्‍चित केले होते. मंत्री विश्‍वजित राणे यांना उद्योग व कायदा व न्यायिक खाते, मंत्री रोहन खंवटे यांना नियोजन व सांख्यिकी खाते देण्याचे ठरविले होते.

मंत्री गोविंद गावडे यांना सहकार, मंत्री मावीन गुदिन्हो यांना वाहतूक, मंत्री नीलेश काब्राल यांना विज्ञान, तंत्रज्ञान, मंत्री मिलिंद नाईक यांना नदी परिवहन आणि प्रोव्हेदोरिया खाते, जयेश साळगावकर यांना राज्य संग्रहालय, मंत्री पाऊसकर यांना हस्तकला खाते देण्याचे ठरविले होते.

अतिरिक्त खाते वाटपाच्या यादीमध्ये भाजप आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्ड या घटक पक्षाचे मंत्री विनोद पालयेकर यांना एकही खाते देण्यात आले नव्हते. या अतिरिक्त खाते वाटपाबाबत माहिती राज्यपालांची मान्यता मिळण्याअगोदर जाहीर झाली. अतिरिक्त खाते वाटपाबाबत काही मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना अतिरिक्त खाते वाटप स्थगित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

असे ठरले होते अतिरिक्त खाते वाटप
• मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत – गृह, वित्त, शिक्षण
• विजय सरदेसाई – वन • विश्‍वजित राणे – उद्योग, कायदा व न्यायिक • मनोहर आजगावकर – राजभाषा, सार्वजनिक गार्‍हाणी • रोहन खंवटे – नियोजन व सांख्यिकी • गोविंद गावडे – सहकार • माविन गुदिन्हो – वाहतूक • नीलेश काब्राल – विज्ञान व तंत्रज्ञान • मिलिंद नाईक – नदी परिवहन व प्रोव्हेदोरिया • जयेश साळगावकर – संग्रहालय • दीपक पाऊसकर – हस्तकला • विनोद पालयेकर – अतिरिक्त खाते नाही