अजून प्रतीक्षाच!

मुंबईतील बॉम्बस्फोटमालिका प्रकरणी २४ वर्षांनंतर दुसरा निवाडा जवळ येऊन ठेपला आहे. आरोपींच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना कठोर सजा होणार हे अपेक्षित आहेच, परंतु त्यांना शिक्षा झाली म्हणजे या बारा स्फोटांत बळी गेलेल्या २५७ जणांना आणि जायबंदी झालेल्या ७१३ जणांना न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. या स्फोटमालिकेचे खरे सूत्रधार विदेशांत सुखाने राहत आहेत. दाऊद इब्राहिमचा केसही कोणी वाकडा करू शकलेला नाही. ज्याच्या दुबईच्या घरी हे सगळे कटकारस्थान शिजले आणि ज्याने शस्त्रास्त्रे पाठवली तो महंमद डोसा, ज्याने मुंबईत बॉम्ब पेरण्यासाठी वाहने आणि माणसे उपलब्ध करून दिली, तो टायगर मेमन विदेशात सुखाने लोळतो आहे. या बॉम्बस्फोट खटल्यातले एक – दोन नव्हे, तब्बल ३३ आरोपी अजूनही फरारी आहेत. गेल्या २४ वर्षांत या देशाच्या तपास यंत्रणा त्यांच्या मुसक्या आवळू शकल्या नाहीत. इंटरपोलने ‘मोस्ट वॉंटेड’ च्या नोटिसा बजावूनही षड्‌यंत्राचे म्होरके अद्याप मोकळे राहिले आहेत. अशा परिस्थितीत या निवाड्यामुळे बॉम्बस्फोटाच्या बळींना न्याय मिळेल असे कसे बरे म्हणावे? दाऊदला भारतात आणण्याच्या आजवर असंख्य वेळा घोषणा झाल्या. गोपीनाथ मुंड्यांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांच्या त्या घोषणा वल्गनाच राहिल्या. दाऊद पाकिस्तानच्या आश्रयाला आहे हे सिद्ध झाले. त्याच्या घरांचे पत्ते सापडले, फोन नंबर सापडले, परंतु दाऊदला पकडता येत नाही! भारतासाठी हे फार मोठे लांच्छन आहे. या सार्‍या स्फोटमालिकेतील बारा आरोपींना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. त्या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बारापैकी अकरा जणांची फाशी जन्मठेपेत रूपांतरित झाली. केवळ एकाला फासावर चढवले गेले त्या याकूब मेमनचा कैवार घ्यायलाही ‘मानवतावादी’ मंडळी पुढे सरसावली. ऐन मोका साधून ‘फाशी असावी की नसावी’ हा वाद ऐरणीवर आणला गेला. याकूबची फाशी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तत्परतेने धाव घेण्यात आली. पण शेवटी त्याच्या पापाचा घडा भरला होता, त्यामुळे त्याला वाचवणे कोणालाही शक्य झाले नाही आणि एक करंटा एकदाचा फासावर गेला. गुन्ह्यानंतर किती वर्षांनी? २२ वर्षांनी! पण त्याचे सगळे साथीदार सुखात आहेत. एकूण १२३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले गेले होते. त्यातल्या वीस जणांना जन्मठेप झाली. बाकीच्यांना तीन वर्षांपासून चौदा वर्षेपर्यंतच्या वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. त्यातले एकेक जण अल्प शिक्षा भोगून बाहेर पडत आहेत. अभिनेता संजय दत्तवर तर विशेष मेहेरबानी महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी दाखवली. काल टाडा न्यायालयात निवाडा येण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायमूर्तीने ‘‘या बॉम्बस्फोट मालिकेचा खटला पुराव्यांविनाच चालवला गेला आहे’’ असे जखमेवर मीठ चोळणारे विधान केले आहे. कोणी कोठे कट शिजवला, कोठून शस्त्रास्त्रे आणली, कोठे उतरवली, मुंबईत कशी आणली, त्यांना वाहने कोणी पुरवली, त्यांत स्फोटके कोणी भरली, ती कोणी कोठे ठेवली हे सगळे काही स्वच्छ समोर असताना यांना आणखी कोणते पुरावे हवे आहेत? या अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळेच देशद्रोह्यांचे फावते. ९३ ची बॉम्बस्फोट मालिका हा भारतातील २६/११ पूर्वीचा सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता. केवळ भारतातच नव्हे, तर जगात दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच आरडीएक्स या अत्यंत विघातक स्फोटकाचा वापर या स्फोटमालिकेसाठी झाला. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र उद्ध्वस्त करण्याचे आणि त्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचे तीनतेरा उडवण्याचे हे महाकारस्थान होते. या आरोपींना दहावेळा फासावर चढवले तरी त्यांचे पाप मिटणार नाही!