अजुनी यौवनात मी!

अजुनी यौवनात मी!

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

मधुकरराव बिछान्यावर पडल्या पडल्या आराम करत होते. अंग नुसते ठणकत होते. रात्री ताप भारी चढलेला. चक्कर पण आली होती. मालतीबाईंनी सकाळीच डॉक्टरांना घरी बोलावून घेतले. डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन गोळ्या, औषधे लिहून दिली.

मालतीबाईंची धावपळ चालू होती. डॉक्टर रावांना बघायला घरी आल्याने सगळे शेजारी भराभरा भेट देत होते. हे जोडपे परिसरात लोकांच्या परिचयाचे होते. सगळ्यांना ते हवेहवेसे वाटायचे. गोष्ट कानावर पडताच शेजारच्या काकू चौकशीला आल्या होत्या. मालतीबाई सांगत होत्या, ‘‘अहो, ह्यांचं हे असच असतं. बघा ना, सकाळी यांना महत्त्वाचे काम होते. वेळ पण ठरलेली होती. गाडी घेऊन हे निघाले. पाहतो तर रस्त्यावर अपघात झालेला. यांनी गाडी बाजूला लावली. एक पोरगा रस्त्यावर पडला होता. त्याच्या डोक्याला भली मोठी जखम झाली होती. रक्ताचा सडा पडला होता. तो बेशुद्ध होता. त्याची मोटरसायकल रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर घसरली होती. बघ्यांची गर्दी झाली होती. ते दाटीने चहुबाजूला उभे होते. त्यांना राहावले नाही. १०८ आली नव्हती. ह्यांनीच त्याला उचलला. आपल्या गाडीत घालून एकट्यानेच इस्पितळ गाठले. मग धावपळ ह्यांची व डॉक्टरलोकांची. खिशात सापडलेल्या पत्त्यावर सांगावा पाठवला. चार तासानंतर नातेवाईक हजर झाले. तेव्हा कुठे यांची सुटका झाली. डॉक्टरांनी जाहीर केले, ‘आउट ऑफ डेंजर!’’ मग हे निघाले.’’ कामाचे तिथेच राहिले. घरी येईतोवर संध्याकाळचे चार वाजले होते. जेवण पण झाले नव्हते.
त्यांना दरवाजात बघून मालतीबाईंना चक्करच आली. सगळे कपडे रक्तबंबाळ झाले होते. वाटले काहीतरी झाले असेल. अरे देवा… मग सर्व समजल्यावर डोके ठिकाणावर आले. गाडीच्या मागच्या सीटवरही रक्त सांडले होते. ते डाग अजूनपर्यंत धुतल्या जात नाहीत.
खरेच, मधुकररावांनी वयाची पर्वा न करता एका जोमात सगळे निभावून नेले होते. रावांचे वय पासष्टीच्या घरात; पण वावर पस्तीशीच्या तरुणाला लाजवेल असा होता. घरी परतेपर्यंत धाप लागली होती. घामाने शरीर भिजले होते. साखर उतरली होती. जेवण करून ते झोपले. नेहमीप्रमाणे रात्री टी. व्ही. बघणे जमले नाही. मग रात्री ताप चढला. त्यानंतर हे सगळे काही. रावांना वाटायचे – आपण अजूनही तरुणच आहोत. सगळी व्यसने त्यानी लांबच ठेवली होती. दारू, तंबाखू, सिगरेट, विडी यांना ते कधी शिवलेही नव्हते. कारण ही व्यसने जोपासायला पैसेच नव्हते. खिशात पैसे जेव्हा जमले तेव्हा तोंड कडू झाले होते. जीभेवरची चव निघून गेलेली. वयाबरोबर डोक्यावरचे केस पण निघून गेलेले. राहिलेले पांढरे झालेले. दर महिन्याला ते कलप करायचे. त्यांना मेकअप आवडत नव्हता. चेहरा वय वाढल्याने सुरकुत्यांनी भरलेला; पण चेहर्‍यावरची छटा पोरालाही लाजवेल अशी होती. दिनक्रम ठरलेला. कामे एवढी उरकायचे की सांगता सोय नव्हती. एवढी ऊर्जा त्यांना कोण देत असेल हा प्रश्‍न प्रत्येकाला पडलेला असायचा.
पण, हल्ली त्यांचे हृदय धडधडायला लागले होते. चक्कर येत होती. जगायचे दिवस संपले होते असे क्षणिक वाटायचे. राव आपल्यातच मग्न झाले होते. कुठंतरी ध्यान लागले होते. ‘अहो ऐकलंत का? तुमच्या आवडीचा थोडा चहा हवा का?’’ ‘हवा का’ म्हटल्यावर एरवी कपाळावर आट्या चढवणारे राव किंचित तोंडातच हसले. नेहमीप्रमाणे शाब्दिक फिरकी घेण्याचे त्राण राहिले नव्हते. हो… आण गं. आता बिछान्यातून उठायला हवे. जास्त झोप घेणे बरोबर नव्हते. रावांची मित्रमंडळी संध्याकाळी येणार होती. त्यांच्या शंकांचे निरसन करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. कसे झाले, काय झाले, अपघात ना तो की घातपात? तुम्हांला काही लागले का? मला काही होण्याचा संबंध नव्हता. पण शंका! एवढं मात्र खरं, जपायला हवं. वय वाढलंय.
त्या दिवशी मित्र म्हणाले, ‘‘काय हो राव, तुमचं पोट तर जाग्यावरच आहे.’’ रावांचे मित्र आपल्या पोटावर एक हात ठेवून उभे होते, दुसरा रावांच्या पोटाचा शोध घेत होता. खरे म्हणजे रावांना स्वत:च्या पोटावर हात फिरवायची सवय नव्हती. त्यांना ढेकरही केव्हाच येत नव्हता. कारण ते पोटभर जेवलेच नाही. आपल्या पोटाचा घेरही त्यांच्या लक्षात आला नव्हता. पण त्यांच्या मित्रांची रावांच्या पोटावर बारीक नजर होती. रावांचे अगदी टापटीप. कुठल्याही समारंभाला जाताना कडक इस्त्री केलेले कपडे घालायचे. समारंभाप्रमाणे कपडे करायचे. पँट, शर्ट मॅचिंग असायचे. डोक्यावरचे केस कमी झालेले… टक्कल जास्त… तरीदेखील राहिलेले केस ते विंचरायचे. त्यांना तेल लावायचे. चेहर्‍यावर क्रिम, वरून पावडर… मग फस फस करत बॉडी स्प्रे मारायचे, अगदी घमघमाट करायचे.
ते तसे पूर्वी नव्हते. एके दिवशी सत्तरी ओलोंडलेले गृहस्थ त्यांना रस्त्यावर भेटले – वॉकिंग ट्रॅकवर! भेटल्यावर गप्पागोष्टी झाल्या. हसतच ते निघून गेले. रावांचा चेहरा नेहमी निर्विकार. हसू बिलकुल नव्हते. या गृहस्थाचे हास्य त्यांना अस्वस्थ करून गेले. घरी गेल्या गेल्या आरशासमोर ठाकले. हसायचा प्रयत्न करू लागले. स्वत:चे हास्य आरशात बघू लागले. ठरवले आता हसायला हवे. नाहीतर त्यांचे मित्र रावांना हिणवायचे. ते खरेही होते. बालपणातील हलाखीच्या परिस्थितीने त्यांचे हसू चोरले होते. त्या गृहस्थाने चांगला मेकअप केला होता. केस विंचारलेले… स्प्रे मारलेला… चेहरा चांगल्या साबणाने अगदी साफ केलेला. त्याचा दरवळ त्यांच्या भोवती पसरलेला होता. रावांनी ठरवले आपणही असेच जगावे. राव सुधारले. तरुण दिसू लागले. मित्रांना हेवा वाटू लागला. तसे ते शिडशिडीत होते. चालायला लागले तर सर्वांना मागे टाकायचे. तरुणपणी तर गावांतल्या लोकांनाही त्यांच्याबरोबर चालायला जमत नव्हते. त्यांना धाप लागायची. पण रावांचा दम औरच होता.
हल्लीचीच गोष्ट – रावांनी ठरवले वाघेरी गडावर चाल करून जायचे. तीन वर्षांपूर्वी कितीतरी वेळा ते दहा-बारा मित्रांना घेऊन चढले होते. त्यात बंदुकधारी माणसेही बरोबर होती. वाटेत शिकार करून ते ताव मारायचे. मग गड उतरून परतायचे. आज ते तारुण्य ओसरले होते. ती नशा अजूनही होती. ठरवले, तयारीही केली. दोन-तीन तासांचा प्रवास होता. रस्ता डोंगर कपारीतून जायचा. वाटेवर दगड-धोंडे पसरलेले होते. काजूचे दिवस होते. जवळच दारूची भट्टी लागली होती. साथीला बारा मंडळी होती. बेत खास होता. खानमामाही बरोबर होता. डोक्यावरच्या टोपलीतील कोंबड्यांची हालचाल चालू होती. अर्ध्या वाटेवर हृदय धडधडायला लागले. उगाचच मुलाबाळांची आठवण झाली. ते थोडावेळ बसले. प्रत्येकाच्या हातात काही ना काही होतेच. तेही थांबले. काहींच्या जवळ वाटेवरच्या भट्टीवर घेतलेल्या बाटल्या होत्या. चढण चढत असताना हळूच बाटली तोंडाला लावायची, घोट घेत घेत पाय तुडवत चालायचे. रावांच्या हातात पण बाटली होती. तीचे घोट घेत घेत तेही चढत होते; पण त्या घोटांत जोम नव्हता. ती बाटली पाण्याची होती. हृदयाची धडधड चालूच होती. उगाचच चिंता वाटत होती. गडावर गेलो तर महागात तर पडणार नाही ना?
शेवटी डोंगराचा माथा गाठला. जागा पक्की केली. जेवणाचा पसारा मांडला गेला. लाकडे रचली गेली. आगीचा प्रकाश सगळीकडे फाकला. तंबूही तयार झाले. रावांची धडधड कमी झाली होती. रात्री झोप काही आली नाही. पट्टेरी वाघाची बातमी कानावर आली होती. जवळच्याच धनगरवाड्यावरील एक म्हैस वाघाने ओढून नेली होती. शेवटी एकदाची पहाट झाली. सगळे गड उतरले. रावही धापा टाकत कसेबसे उतरले. परत डोंगर न चढायची शपथ घेत. धडपडलेल्या हृदयाची खबरबात कुणालाही त्यांनी लागू दिली नव्हती. आज बिछान्यावर पडल्या पडल्या रावांच्या डोळ्यासमोरून तरुणपणातील क्षण जात होते. ऐन उमेदीतले ते दिवस होते. रावांच्या डोळ्यात तेज होते. अजून खुमखुमी बाकी होती. राव अजूनही यौवनात होते!
………….

 

Leave a Reply