ब्रेकिंग न्यूज़

अखेर तेलगू देसमचा एनडीए सरकारला रामराम

>> सरकारविरोधात अविश्‍वास ठरावही

अखेर आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जा देण्याची मागणी केंद्र मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ काल तेलगू देसम पार्टीने (तेदेपा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पाठिंबा अधिकृतरित्या काढल्याचे जाहीर केले.

तेदेपाच्या खासदारांच्या बैठकीतील चर्चेत याबाबत एकमताने हा निर्णय घेण्याबरोबरच सरकारवर अविश्‍वास ठराव लोकसभेत दाखल करण्याचाही निर्णय घेतल्याचे या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले. अशा अविश्‍वास ठरावाची नोटीस वायएसआर कॉंग्रेसने याआधीच दाखल केली आहे. या घडामोडीमुळे एनडीएचे संख्याबळ ३१४ वर घसरले आहे.

तेदेपाच्या या निर्णयाला कॉंग्रेससह तृणमूल कॉंग्रेस, माकप, एआयएसआयएम, राजद यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, रेणुका चौधरी, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, माकपचे सीताराम येच्युरी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तेदेपाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी याप्रश्‍नी याआधीच राजिनामे दिले आहेत.